सौरभ शर्मा प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. मेंडोरीच्या जंगलातून ५२ किलो सोनं आणि रोख रक्कम भरलेली एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली. ती गाडी तिथे नेणाऱ्या आणि पार्क करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. याशिवाय सौरभच्या घरातून जप्त केलेल्या डायरीमध्ये वाहतूक तपासणी नाक्यावरून झालेल्या वसुलीची नोंदही आढळली आहे.
लोकायुक्तांनी सौरभ शर्मा यांच्या घरावर छापा टाकला, त्यानंतर ईडीने भोपाळ, जबलपूर आणि ग्वाल्हेर येथील सौरभ आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर छापे टाकले. याच दरम्यान, भोपाळमधील एका जंगलातून आयकर अधिकाऱ्यांनी एक कार जप्त केली ज्यामध्ये ५२ किलो सोने आणि १० कोटी रुपये रोख होते. सध्या चौकशी सुरू आहे. या तपासात, अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर आयकर विभागाला महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे, अरेरा कॉलनी ते मेंदोरीच्या जंगलापर्यंत गाडीचा संपूर्ण रुट आता आयकर विभागाकडे आला आहे. याशिवाय, हे देखील स्पष्ट झाले आहे की गाडी एकट्याने जंगलात नेण्यात आली नव्हती तर ती ३ वाहनांच्या ताफ्यात नेण्यात आली होती. ती गाडी चेतन गौरच्या नावावर नोंदणीकृत होती. चेतनने आधीच आयकर विभागाला सांगितलं आहे की, कारमध्ये सापडलेले सोने आणि रोख रक्कम सौरभची आहे.
आता, आयकर चौकशीदरम्यान, सौरभचा एक नातेवाईक, ज्याला तो मेहुणा म्हणतो, तो गाडी जंगलात नेण्यात सहभागी होता हे उघड झालं आहे. त्या नातेवाईकाचा मुलगाही यामध्ये सामील होता. दोघांनीही ताफ्याच्या संरक्षणाखाली गाडी जंगलात नेली होती. ज्या प्लॉटवर गाडी सापडली ती देखील सौरभची मावशी असलेल्या महिलेच्या मुलीच्या नावावर नोंदणीकृत आहे.
आता आयकर विभागाला जंगलात सापडलेल्या सोने आणि रोख रकमेने भरलेल्या कारचं सौरभ शर्माशी असलेलं कनेक्शन पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. याशिवाय, आयकर विभागाने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ची चौकशी देखील हाती घेतली आहे आणि सौरभ, त्याचे नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या बेनामी मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.