मॅट्रिमोनियलवर जोडीदार शोधणाऱ्यांनो सावधान! महिलांना लाखोंना गंडविले; घरासाठी पतीवर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:29 IST2025-12-18T12:28:35+5:302025-12-18T12:29:05+5:30
विवाह जुळविताना तुम्ही जर मॅट्रिमोनियल साइटचा आधार घेत असाल तर वेळीच सावध होण्याचा सल्ला ठाणे पोलिसांनी दिला आहे.

मॅट्रिमोनियलवर जोडीदार शोधणाऱ्यांनो सावधान! महिलांना लाखोंना गंडविले; घरासाठी पतीवर चाकूहल्ला
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विवाह जुळविताना तुम्ही जर मॅट्रिमोनियल साइटचा आधार घेत असाल तर वेळीच सावध होण्याचा सल्ला ठाणे पोलिसांनी दिला आहे. गेल्या वर्षभरात यातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले. दोन घटनांमध्ये नवीन घराच्या बुकिंगच्या नावाखाली दोन महिलांकडून दोघांनी लाखो रुपये उकळले. तर तिसऱ्या वागळे इस्टेट येथील घटनेत महिलेने घर नावावर करण्यासाठी पतीवरच चाकूने खुनी हल्ला केला.
महिलेची १४ लाखांची फसवणूक
लग्नाच्या आमिषाने ३१ वर्षीय महिलेची समीर ऊर्फ हार्दिक नाईक (रा. घणसोली, नवी मुंबई) या भामट्याने फसवणूक केली. कोरोना काळात एप्रिल २०२० मध्ये या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती तिच्या १२ वर्षीय मुलीसह ठाण्यात राहते. दुसरे लग्न करून नव्याने सुरुवात करण्यासाठी तिने २०२३ मध्ये 'जीवनसाथी' या मॅरेज अॅपवर नोंदणी केली होती.
याच अॅपद्वारे तिची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समीरशी ओळख झाली. आपण पत्नीपासून घटस्फोट घेत असून, ठाण्यात वागळे इस्टेट येथील एका कंपनीत नोकरीला असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, ८ फेब्रुवारी ते ४ सप्टेंबर २०२५ या काळात त्याने वेळोवेळी तिच्याशी गोड बोलून लग्नाचे आमिष दाखवत लग्नानंतर राहण्यासाठी घणसोली येथे नवीन घर बुक केल्याची बतावणी केली. याच घराचे पैसे भरण्याचा बहाणा करीत तिच्याकडून १२ लाख सहा हजार ७०० रुपये तर तिच्या मामेभावाकडून दोन लाख रुपये असे १४ लाख सहा हजार ७०० रुपये त्याने घेतले. त्यानंतर त्याने तिचे पैसेही परत केले नाही आणि तिच्याशी लग्नही न करता फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
कोपरीतील महिलेची ३५ लाखांची फसवणूक
अविवाहित असून हॉटेलचा व्यवसाय आहे. नवी मुंबईतील इमारतीत घर बुक करण्याची बतावणी करीत गिरीधर पाटील (४०) याने ४३ वर्षीय महिलेची लग्नाच्या आमिषाने ३५ लाखांची फसवणूक केली. कोपरीतील पीडित महिला मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिच्या पतीचे २०२२ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. सासूने सुचविल्यामुळे तिने पतीच्या वर्षश्राद्धानंतर वर शोधणे सुरू केले.
तिनेही जून २०२४ मध्ये तिने शादी डॉट कॉम आणि जोडी अशा अॅपवर माहिती भरल्यानंतर तिला ऑगस्ट २०२४ मध्ये जोडी अॅपवरील नोंदीतील गिरीधर याचा फोन आला. त्याने अविवाहित असल्याचे सांगत तिच्याशी विवाह न करता तिची १४ सप्टेंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ३५ लाखांची फसवणूक केली.
पतीवर चाकूहल्ला
सासूच्या नावावरील घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी तगादा लावूनही त्यास विरोध करणाऱ्या सचिन भिडे (४९) या पतीवर सरिता (४३) या पत्नीने चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना ५ डिसेंबर रोजी घडली. दोघांचाही हा दुसरा विवाह होता. एका विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर लागलीच सरिताने सचिनकडे सासूच्या नावावर असलेले घर आपल्या नावावर करण्यासाठी तगादा लावला. घर नावावर केले नाही तर आपण काय चीज आहे, ते तुम्हाला लवकरच कळेल, अशी धमकी देत सरिताने पतीवर चाकू हल्ला केला.