अपघातानंतर जिम ट्रेनर बनला 'सायको'; चिमुरड्याला फुटबॉलसारखी लाथ मारली, अनेक मुलांवर आधीही केलेत हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:16 IST2025-12-20T14:13:40+5:302025-12-20T14:16:06+5:30
बंगळुरूमध्ये चिमुरड्याला फुटबॉलसारखी लाथ मारणाऱ्याला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

अपघातानंतर जिम ट्रेनर बनला 'सायको'; चिमुरड्याला फुटबॉलसारखी लाथ मारली, अनेक मुलांवर आधीही केलेत हल्ले
Bengaluru Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. बनशंकरी आणि त्यागराजनगर परिसरात एका ३५ वर्षीय माजी जिम ट्रेनरने खेळणाऱ्या एका ५ वर्षांच्या चिमुरड्याला विनाकारण अतिशय जोरात लाथ मारल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:१५ च्या सुमारास ही घटना घडली. नैव जैन हा ५ वर्षांचा मुलगा आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. तिथे जुन्या पोस्ट ऑफिस रोडवर तो आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. त्यावेळी संशयित आरोपी रंजन हा अचानक मागून धावत आला आणि त्याने नैवला पाठीमागून जोरदार लाथ मारली. ही लाथ इतकी भीषण होती की, तो मुलगा हवेत उडून रस्त्यावर तोंडावर पडला.
मुलाची आई, दीपिका जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, "माझ्या मुलाला एखाद्या फुटबॉलसारखे लाथ मारून फेकून दिले गेले." या हल्ल्यात मुलाच्या डोळ्याच्या वर जखम झाली असून हात-पायांना गंभीर ओरखडे आले आहेत.
तपास आणि पोलिसांची कारवाई
घटनेनंतर दीपिका जैन यांनी तातडीने बनशंकरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांनी याची नोंद अदखलपात्र गुन्हा म्हणून केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन भारतीय न्याय संहिताच्या कलम ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.
तपासात समोर आलेले धक्कादायक खुलासे
तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, हे केवळ एकच प्रकरण नसून, रंजनने परिसरातील इतर किमान तीन लहान मुली आणि मुलांवरही अशाच प्रकारचे हल्ले केले आहेत. आरोपी रंजन हा पूर्वी बन्नेरघट्टा रोडवर जिम ट्रेनर म्हणून काम करायचा. मात्र, तीन महिन्यांपूर्वी त्याचा एक अपघात झाला होता, ज्यानंतर त्याच्या वागण्यात मोठा बदल झाला. तो मानसिक आजाराने त्रस्त असून सध्या एकटाच राहतो, अशी माहिती समोर आली आहे.
आरोपी रंजनला सध्या मदुराई येथील एका रुग्णालयातील निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले आहे. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुरू आहेत. तो कायदेशीर प्रक्रियेसाठी फिट आहे की नाही, याचा अहवाल वैद्यकीय पथकाकडून मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील इतर पीडित कुटुंबांनाही पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करता येतील.