अवैध संबंध, दागिन्यांची हौस... कन्नड चित्रपट पाहून रचला हत्येचे कट; ४ महिन्यांनी उलगडलं गूढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:07 IST2025-03-14T11:06:26+5:302025-03-14T11:07:20+5:30

महिलेची हत्या करून तिचे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या लक्ष्मण या इलेक्ट्रिशियनला पोलिसांनी अटक केली आहे

bengaluru police arrested electrician he drishya movie inspired and killed woman | अवैध संबंध, दागिन्यांची हौस... कन्नड चित्रपट पाहून रचला हत्येचे कट; ४ महिन्यांनी उलगडलं गूढ

फोटो - zeenews

चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या ५० वर्षीय डी मेरी हत्या प्रकरणाचा तपास करण्यात बंगळुरू पोलिसांना यश आलं आहे. महिलेची हत्या करून तिचे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या लक्ष्मण (३०) या इलेक्ट्रिशियनला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मेरीच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला आणि दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसला. यानंतर गळा दाबून तिचा खून केला. जानेवारीमध्ये फोन कॉल रेकॉर्डमधून पोलिसांना सुगावा लागला आणि ९ मार्च रोजी लक्ष्मणला अटक केली.

लक्ष्मण बंगळुरूतील येलहंका येथील नगेनहल्ली येथे राहत होता आणि तो इलेक्ट्रिशियन तसेच ऑटो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून तो कर्जात बुडाला होता. त्याने चिकन शॉपमध्ये १२ लाख रुपये गुंतवले होते, पण या व्यवसायात त्याला मोठं नुकसान सहन करावं लागले. पैसे परत करण्यासाठी त्याने डी मेरीला लुटण्याचा आणि मारण्याचा कट रचला. त्याने आधी मेरीच्या घराची वीज तोडली. जेव्हा तो वीज दुरुस्त करण्यासाठी आला तेव्हा स्कार्फने गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर त्याने कचरा फेकण्याच्या बहाण्याने एका नातेवाईकाला (ऑटो ड्रायव्हर) बोलावलं आणि मेरीचा मृतदेह एका पोत्यात भरून ऑटोमध्ये ठेवला. मृतदेह डंपयार्डमध्ये फेकून दिला.

आरोपीला कसं पकडलं?

२७ नोव्हेंबर २०२३ रोजी, मेरीची भाची जेनिफरने पोलिसांकडे  मेरी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. टीओआयच्या रिपोर्टनुसार, जानेवारीमध्ये पोलिसांनी मेरीच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मिळवला तेव्हा त्यांना त्यात लक्ष्मणची संशयास्पद भूमिका आढळली. तपासादरम्यान, लक्ष्मणचे दोन महिलांशी अवैध संबंध असल्याचं पोलिसांना आढळून आले. ९ मार्च रोजी जेव्हा तो त्यांच्यापैकी एका मैत्रिणीला भेटायला गेला तेव्हा त्याला अटक केली.

चित्रपटातून मिळाली पुरावे नष्ट करण्याची कल्पना

लक्ष्मणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने 'दृश्य' हा कन्नड चित्रपट पाहून पुरावे नष्ट करण्याच्या पद्धती शिकल्या आहेत. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मेरीचा मोबाईल, सिम कार्ड कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिला आणि फोन ट्रकमध्ये टाकला. हत्येच्या चार महिन्यांनंतर पोलिसांना एका डंपयार्डमध्ये मेरीचा सांगाडा सापडला.

दागिन्यांचं काय झालं?

लक्ष्मणने मेरीचे दागिने गहाण ठेवून त्याच्या प्रेयसीची स्कूटर सोडवून घेतली. ६०,००० रुपये देऊन प्रेयसीची स्कूटर परत मिळवली. पोलीस आता त्याचाही तपास करत आहेत.
 

Web Title: bengaluru police arrested electrician he drishya movie inspired and killed woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.