बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 08:17 IST2025-10-31T08:16:35+5:302025-10-31T08:17:10+5:30
दिवाळी सेल दरम्यान Amazon एपवरून १.८५ लाख रुपयांचा Samsung Z Fold स्मार्टफोन खरेदी केला होता.

बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला ऑनलाईन ऑर्डर केलेल्या महागड्या मोबाईलऐवजी टाइलचा तुकडा पाठवण्यात आला. प्रेमानंद असं या व्यक्तीचं नाव असून त्याने दिवाळी सेल दरम्यान Amazon एपवरून १.८५ लाख रुपयांचा Samsung Z Fold स्मार्टफोन खरेदी केला होता.
प्रेमानंदने त्याच्या क्रेडिट कार्डने पूर्ण रक्कम भरली आणि नियोजित तारखेला डिलिव्हरी मिळाली. जेव्हा त्याने बॉक्स उघडला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. आत त्याला फोन नाही तर टाइलचा एक तुकडा सापडला. त्याने स्पष्ट केलं की, टाइलचे वजन फोनइतकेच होतं, त्यामुळे पॅकेज मिळाल्यावर त्याला अजिबात कोणताही संशय आला नाही.
डिलिव्हरी बॉक्स उघडताना त्याने हुशारीने त्याचा संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो आता त्याच्या बाजूने भक्कम पुरावा असल्याचं सिद्ध झालं आहे. डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले, त्यानंतर त्याने राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) वर तक्रार दाखल केली.
प्रेमानंदने व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि खरेदीशी संबंधित सर्व कागदपत्रं पोलिसांना सोपवली. त्यांनी १९ ऑक्टोबर रोजी Amazon कस्टमर केअरमध्ये तक्रार दाखल केली, त्यानंतर कंपनीने त्यांची संपूर्ण रक्कम परत केली.
कुमारस्वामी लेआउट पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डिलिव्हरी चेनमध्ये कुठे फसवणूक झाली हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत: ते वेअरहाऊस, ट्रान्झिट की स्थानिक पातळीवर ऑनलाइन फसवणूक झाली आहे का याचा तपास करत आहेत.