"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:27 IST2025-11-08T16:26:44+5:302025-11-08T16:27:47+5:30
तरुणीने चालकाचं हे वर्तन तिच्या मोबाईलवर रेकॉर्ड केलं आणि पोलिसांना माहिती दिली.

फोटो - ndtv.in
बंगळुरूमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. तरुणीने तिच्यावर झालेली धक्कादायक घटना इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केली आहे. ती चर्च स्ट्रीटवरून रॅपिडो बाईकवरून तिच्या घरी परतत होती. यावेळी रॅपिडो चालकाने तिचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ती घाबरली. तरुणीने चालकाचं हे वर्तन तिच्या मोबाईलवर रेकॉर्ड केलं आणि पोलिसांना माहिती दिली.
तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता ही घटना घडली जेव्हा ती रॅपिडोने घरी येत होती. मी चालकाला अनेक वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. हे इतकं अचानक घडलं की मला नेमकं काय करावं हेच पटकन सुचलं नाही. त्याने जेव्हा पुन्हा असं केलं तेव्हा मी "भैया, क्या कर रहे हो, मत करो" असं म्हटलं. पण तो थांबला नाही."
"मी फक्त माझं ठिकाण येण्याची वाट पाहत होती. मी जेव्हा लोकेशनवर पोहोचली तेव्हा जवळ उभ्या असलेल्या एका माणसाने मला पाहिले आणि कदाचित त्याला काहीतरी गडबड आहे हे समजलं. त्याने मला विचारलं की काय झाले? तेव्हा मी माझ्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. "
"माझ्यासोबत असलेल्या माणसाने चालकाला याचा जाब विचारला. तो त्याच्याशी भांडला तेव्हा चालकाने माफी मागितली आणि पुन्हा असं करणार नाही असं म्हणाला. पण पुढे गेल्यावर रॅपिडो चालकाने मला हाताने इशारे केले. ज्यामुळे मला आणखी असुरक्षित वाटलं. मी हे शेअर करत आहे कारण कोणत्याही महिलेला असं काही सहन करावे लागू नये" असं तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.