मानेवरील 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी मोठा बनाव; टॅक्सी चालकावर बलात्काराची खोटी तक्रार, CCTV ने वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:44 IST2025-12-12T19:40:32+5:302025-12-12T19:44:32+5:30

बंगळुरूमध्ये सामूहिक बलात्काराचा बनाव उघड झाला असून बॉयफ्रेंडच्या प्रश्नांना टाळण्यासाठी नर्सिंग विद्यार्थिनीकडून खोटी तक्रार केल्याचे समोर आलं आहे.

Bengaluru Gang rape hoax exposed Nursing student files false complaint to avoid boyfriend questions | मानेवरील 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी मोठा बनाव; टॅक्सी चालकावर बलात्काराची खोटी तक्रार, CCTV ने वाचवले

मानेवरील 'लव्ह बाईट' लपवण्यासाठी मोठा बनाव; टॅक्सी चालकावर बलात्काराची खोटी तक्रार, CCTV ने वाचवले

Bengaluru Crime: कर्नाटकमधील बंगळूरु येथे एका २२ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीने दाखल केलेली सामूहिक बलात्काराची तक्रार खोटी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. टॅक्सी चालक आणि त्याच्या साथीदारांनी सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलजवळ चालत्या गाडीत आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा या विद्यार्थिनीचा दावा होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हॉट्सॲप चॅट्सच्या तपासणीतून हे प्रकरण परस्पर संमतीने झाले असल्याचे निष्पन्न झाले.

नेमकी घटना काय?

मूळची केरळची असलेली आणि बंगळूरुमध्ये एका खासगी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या या नर्सिंग विद्यार्थिनीने ६ डिसेंबर रोजी मडीवाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २ डिसेंबरच्या रात्री सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलजवळ टॅक्सी चालक आणि त्याच्या अनेक मित्रांनी गाडीत आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा तिचा आरोप होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि तो बानावाडी पोलीस ठाण्यात वर्ग केला. विद्यार्थिनीच्या जबाबाच्या आधारावर, टॅक्सी चालकाला त्याच्या पूर्व बंगळूरुमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेला टॅक्सी चालक (वय ३३) विवाहित असून दोन मुलांचा बाप आहे. आपल्यावरील सामूहिक बलात्काराच्या आरोपांमुळे त्याला मोठा धक्का बसला. मात्र, अटकेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याने सातत्याने आपण निर्दोष असल्याचे सांगत होता. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आणि सत्य शोधण्यासाठी घटनास्थळावरील पुरावे तपासले.

पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. २ डिसेंबरच्या रात्री ११.३० ते ३ डिसेंबरच्या पहाटे ५.३० वाजेपर्यंत विद्यार्थिनी आणि टॅक्सी चालक रेल्वे स्टेशन परिसरात एकत्र असल्याचे पाहून पोलीसही चक्रावून गेले. फुटेजमध्ये दोघेही टॅक्सीतून बाहेर पडताना, रात्रीच्या वेळी पुन्हा गाडीत बसताना आणि स्टेशन परिसरात फिरताना स्पष्ट दिसत होते. पहाटे ५.३० नंतर विद्यार्थिनी एर्नाकुलमला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थिनीने उल्लेख केलेले सामूहिक बलात्कारातील साथीदार फुटेजमध्ये कुठेही दिसले नाहीत.

पोलिसांनी टॅक्सी चालकाचा व्हॉट्सॲप तपासले असता, विद्यार्थिनीने ३ डिसेंबरपासून त्याला अनेक मेसेज पाठवल्याचे उघड झाले. हे मेसेज त्यांच्यातील संबंध चांगले असल्याचे आणि त्यांच्यातील भेटीनंतरही चांगला संवाद असल्याचे दर्शवत होते, ज्यामुळे परस्पर संमतीने संबंध आल्याचा निष्कर्ष निघाला. सीसीटीव्ही आणि व्हॉट्सॲप पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी विद्यार्थिनीला पुन्हा चौकशीसाठी बोलावले.

पोलिसी खाक्या दाखवताच तिने सत्य कबूल केले. टॅक्सीत असताना चालकासोबत झालेल्या संवादादरम्यान तिच्या मानेवर नखांचे ओरखडे उमटले होते. एर्नाकुलममधील तिच्या बॉयफ्रेंडने हे ओरखडे पाहिले आणि त्याबद्दल प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देणे टाळण्यासाठी, तसेच त्याला घाबरून तिने सामूहिक बलात्काराची खोटी कहाणी रचल्याची कबुली दिली.

टॅक्सी चालकाच्या म्हणण्यानुसार, तो आणि विद्यार्थिनी दोघेही केरळचे असल्याने त्यांची ओळख झाली होती. त्याने तिला स्टेशनवर सोडले होते आणि ट्रेन पकडण्यापूर्वी तिने बॉयफ्रेंडला फोन करून माहितीही दिली होती. सध्या अटकेत असलेला टॅक्सी चालक निर्दोष असल्याचा दावा करत असून, पोलीस तपास अजूनही सुरू आहे. खोट्या तक्रारीमुळे एका निष्पाप व्यक्तीला तुरुंगात जावे लागले, या घटनेमुळे बंगळूरुमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Bengaluru Gang rape hoax exposed Nursing student files false complaint to avoid boyfriend questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.