एकाने जाळ्यात अडकवल्यानंतर इतरांनी बनवलं वासनेचं बळी; बंगळुरुत शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:40 IST2025-07-15T19:14:21+5:302025-07-15T19:40:20+5:30
कर्नाटकत शिक्षकांनी विद्यार्थिनीवर बलात्कार करुन तिला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकाने जाळ्यात अडकवल्यानंतर इतरांनी बनवलं वासनेचं बळी; बंगळुरुत शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर बलात्कार
Bengaluru Crime: देशभरातून शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची प्रकरणे ताजी असतानाच कर्नाटकातील बंगळुरू येथून दोन शिक्षकांचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. बंगळुरुतल्या भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला. दोघांनीही विद्यार्थिनीला ब्लॅकमेल केले आणि तिला अनेक वेळा त्यांच्या वासनेचा बळी बनवले. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षकांसह त्यांच्या दोन मित्रांना अटक केली.
बेंगळुरू येथील एका महाविद्यालयातील शिक्षकांनी एका विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राच्या लेक्चररला त्यांच्या मित्रासह अटक केली. भौतिकशास्त्राचा लेक्चरर नरेंद्र, जीवशास्त्राचा लेक्चरर संदीप आणि त्यांचा मित्र अनुप हे येथील एका खाजगी महाविद्यालयात काम करतात. पीडित मुलगी देखील याच महाविद्यालयाची विद्यार्थी होती. आधी नरेंद्रने नोट्स देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यानीशी संपर्क साधला आणि दोघेही मित्र बनले. त्यानंतर नरेंद्रने एके दिवशी विद्यार्थिनीला अनुपच्या खोलीत बोलावले, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. यादरम्यान त्याने विद्यार्थिनीला धमकीही दिली की जर तिने याबद्दल कोणाला सांगितले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.
काही दिवसांनंतर, संदीपनेही विद्यार्थिनीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला तेव्हा त्याने तिला ब्लॅकमेल केले आणि नरेंद्रसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्याकडे असल्याचा दावा केला. त्यानंतर संदीपने विद्यार्थिनीवर बलात्कार केला. यानंतर अनूपने विद्यार्थिनीला त्याच्या खोलीत प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज दाखवून धमकी दिली आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या सगळ्या प्रकारानंतर विद्यार्थिनीने तिच्या पालकांना याबद्दल माहिती दिली. या कुटुंबाने कर्नाटक राज्य महिला आयोगाशी संपर्क साधला आणि मराठाहल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर नरेंद्र, संदीप आणि अनुप यांना अटक करण्यात आली.