अतुल सुभाष प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. बंगळुरू पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस तपासासाठी जौनपूरला पोहोचले आहेत. मात्र अतुलच्या सासरच्या घराला कुलूप आहे, त्याची सासू रात्रीच घरातून निघून गेली आहे. या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाबाबत अतुल सुभाषच्या वडिलांनी 'आज तक'शी संवाद साधला.
अतुलच्या वडिलांनी सांगितलं की, एप्रिल २०१९ मध्ये मुलाचं लग्न झालं होतं. यानंतर सून मुलासह बिहारला आली आणि २ दिवसांनी निघून गेली. यानंतर तिने मुलाला हनिमूनसाठी मॉरिशसला जायचं असल्याचं सांगितलं. त्यावर मुलाने बाबा, मी जाऊ का? असं विचारलं. तेव्हा मी म्हणालो की, सुनेची इच्छा असेल तर जा. त्यानंतर दोघेही मॉरिशसला गेले. २०२० मध्ये नातवाचा जन्म झाला.
नातू लहान होता म्हणून मी माझ्या पत्नीला बंगळुरूला पाठवलं. २०२१ मध्ये जेव्हा देशभरात कोरोनामुळे परिस्थिती बिकट होती, तेव्हाही मुलगा तिथे होता आणि त्याची आईही होती. मात्र, आईला मधुमेह असल्याने २०२१ मध्ये मुलाची काळजी घेण्यासाठी त्याने सासूला बोलावलं. निकिताची आई म्हणजेच अतुलची सासू बंगळुरूला येताच घरातील परिस्थिती आणखी बिघडू लागली आणि वाद सुरू झाला आणि मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
काही दिवसांनी अतुलच्या सासूने त्याला सांगितलं की, आपल्याला जौनपूरमध्ये घर घ्यायचं आहे आणि त्यामुळे काही पैशांची गरज आहे. कारण जौनपूरमधलं त्यांचं घर हे अतिशय गलिच्छ ठिकाणी आहे. त्यानंतर अतुलने घर घेण्यासाठी सासूला १८ लाख रुपये ऑनलाइन दिले. मात्र, त्यानंतर सासूने पुन्हा अतुलकडे २० लाखांची मागणी केली, मात्र अतुलने नकार देत आता वडिलांच्या परवानगीशिवाय इतके पैसे देऊ शकणार नसल्याचं सांगितलं.
सासूने पुन्हा पैसे मागितल्यावर अतुल म्हणाला की, आम्ही काहीही करण्यापूर्वी घरच्यांना विचारतो. यानंतर अतुलच्या सासूची दुसऱ्या दिवशी जौनपूरला जाण्यासाठी फ्लाइट होती, मात्र तिने जौनपूरला येण्यास नकार देत आपण तीन दिवस राहणार असल्याचं सांगितलं. तीन दिवसांत त्याच्या सासूने काय केलं माहित नाही?
इथूनच परिस्थिती बिकट होऊ लागली. यानंतर ती आपल्या मुलीला आणि नातवाला घेऊन जौनपूरला आली. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाबाबत अतुलच्या वडिलांनी सांगितलं की, सून निकिताच्या कुटुंबीयांनी हुंडा म्हणून एकही पैसा दिला नाही. बंगळुरूहून जौनपूरला आल्यानंतरच अतुलच्या सासूचा दृष्टिकोन बदलला आणि त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये तिने कोर्टात केस दाखल केली. अतुल आणि निकिता यांच्यात भांडण नव्हतं. पण निकिताच्या आईमुळे सर्व काही बिघडलं. माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.