सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:03 IST2025-08-10T12:02:47+5:302025-08-10T12:03:06+5:30
एकीकडे ऑनलाईन स्कॅमिंगचे प्रकार वाढत असताना आता मुंबईतील एका वृद्धाला मैत्रीच्या नादात तब्बल ९ कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एखाद्याला मैत्री किंवा प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या घटना सध्या वाढताना दिसत आहेत. एकीकडे ऑनलाईन स्कॅमिंगचे प्रकार वाढत असताना आता मुंबईतील एका वृद्धाला मैत्रीच्या नादात तब्बल ९ कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या ऑनलाईन मैत्रिणींनी आजोबांकडून ७३४ वेळा तब्बल ८.७ कोटी रुपये उकळले आहेत. २०२३मध्ये या प्रकरणाची सुरुवात झाली होती.
नेमकं झालं काय?
या प्रकरणाची सुरुवात एप्रिल २०२३ मध्ये सुरू झाली. या वृद्ध व्यक्तीने फेसबुकवर शर्वी नावाच्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. सुरुवातीला महिलेने त्याची रिक्वेस्ट नाकारली, परंतु काही दिवसांनी त्याच महिलेने स्वतः या वृद्धाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. हळूहळू दोघांमध्य संभाषण सुरू झाले, जे व्हॉट्सअॅप चॅटपर्यंत पोहोचले. शर्वीने आपल्याबद्दल माहिती देऊन या वृद्धाला जाळ्यात ओढले. या तरुणीने आपण घटस्फोटित असून, दोन मुलांची आई असल्याचे सांगितले. इतकंच नाही तर, सध्या तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कधी मुलांच्या आजाराचे निमित्त करून तर कधी आर्थिक संकटाचे निमित्त करून ती वृद्ध माणसाकडून वारंवार पैसे मागत राहिली आणि प्रत्येक वेळी तो वृद्ध तिला मदत करत होता.
फसवणूक कशी सुरू झाली?
मात्र, हे प्रकरण इथेच थांबले नाही. काही काळाने कविता नावाची आणखी एक महिलाही यात सामील झाली. तिने वृद्धाला अश्लील मेसेज पाठवले आणि नंतर एका आजारी मुलाच्या उपचाराच्या नावाखाली पैसे मागितले. यानंतर, दिनाज नावाची एक महिला पुढे आली, तिने स्वतःची ओळख शर्वीची बहीण म्हणून करून दिली. तिने सांगितले की शर्वीचा मृत्यू झाला आहे आणि मरण्यापूर्वी तिने तिच्या रुग्णालयाचे बिल भरण्याची जबाबदारी त्या वृद्ध व्यक्तीवर सोपवली होती.
दिनाजने व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट पाठवून त्या वृद्धाला पटवून दिले आणि त्याच्याकडून पैसे घेतले. जेव्हा वृद्धाने पैसे परत मागितले तेव्हा तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर, जास्मिन नावाची यात पुढे आली, तिने स्वतःला दिनाजची मैत्रीण म्हणून ओळख करून दिली आणि मदतीची याचना केली.
या वृद्धांने तिलाही पैसे पाठवले. एकामागून एक नवीन तरुणी येत राहिल्या आणि हा वृद्ध व्यक्ति फसवणुकीच्या जाळ्यात अडकत राहिला. या काळात तब्बल ७३४ वेळा, ८.७ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. आयुष्यभराची सगळी कमाई गमावल्यानंतर, त्याने त्याच्या सुनेकडून २ लाख रुपये उधार घेतले आणि मुलाकडून ५ लाख रुपये मागितले. त्यावेळी मुलाला संशय आला आणि त्याला संपूर्ण प्रकरणाची सत्यता कळली.
सत्य बाहेर आल्यानंतर, वृद्ध व्यक्तीला इतका धक्का बसला की त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. २२ जुलै रोजी वृद्ध व्यक्तीने सायबर क्राइम हेल्पलाइनवर याबद्दल तक्रार केली. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.