‘कारभारी लयभारी’तील गंगाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 07:26 AM2021-02-28T07:26:10+5:302021-02-28T07:26:32+5:30

पैसे हिसकावत हल्लेखोर पसार; पंतनगर पोलिसांत एनसी दाखल

Beating Ganga in 'Karbhari Layabhari' | ‘कारभारी लयभारी’तील गंगाला मारहाण

‘कारभारी लयभारी’तील गंगाला मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : तू कोणत्या समूहातील आहेस? तुझा गुरू कोण? असे प्रश्न विचारत झी मराठी वहिनीवरील ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील गंगा हे पात्र  साकारणाऱ्या प्रणीत हाटे या तृतीयपंथीयाला घाटकोपर परिसरात अनोळखी व्यक्तीने मारहाण करून तिचे पैसे हिसकावून पळ काढला. शुक्रवारी हा प्रकार घडल्याची माहिती एका व्हिडिओमार्फत शेअर झाली. तिने या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र  गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू आहे. 


 गंगा २५ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मित्राला नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये सोडण्यासाठी गेली हाेती. त्यावेळी तिला एका अनाेळख्या व्यक्तीने मारहाण केली. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी येथे हा धक्कादायक प्रकार घडला. हल्लेखोर हा तृतीयपंथी होता. त्याने ‘तू एवढे मोठे केस का वाढवले? कोणत्या समूहातील आहेस? तुझा गुरू कोण?’ असे प्रश्न विचारून नंतर गंगाला मारहाण करण्यास सुरुवात केली.  

 

तिचे केस हातात धरून जोरात ओढू लागला. गंगाच्या मित्राने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर ती दोघे घटनास्थळाहून पळाली आणि रिक्षात बसल्यावर याचा व्हिडिओ तयार करत चाहत्यांना याची माहिती दिली. 
प्रचंड मेहनत घेऊन यशाचे शिखर गाठणाऱ्या गंगाला व्हिडिओवर ओक्साबोक्सी रडताना पाहून तिच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त करत कठोर कारवाई करावी, असे मत सोशल मीडियावर व्यक्त केले. या हल्ल्यात गंगाकडील रोख रक्कमही हल्लेखोराने हिसकावून घेतल्याचे समजते. पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. 

अदखलपात्र गुन्ह्याची नोंद 
आम्ही याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, तक्रारदारांचा जबाब नोंदविला आहे, तसेच आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पडताळणी सुरू असून, लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 
- सुहास कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंतनगर पोलीस ठाणे 
 

Web Title: Beating Ganga in 'Karbhari Layabhari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.