खळबळजनक! चहामध्ये उंदीर मारण्याचं औषध टाकून नवऱ्याला संपवलं, नंतर लटकवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:25 IST2025-04-18T17:23:58+5:302025-04-18T17:25:02+5:30
एका पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला उंदीर मारण्याचं औषध दिलं.

फोटो - आजतक
मेरठनंतर आता बरेलीमध्येही पतीची हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. एका पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला उंदीर मारण्याचं औषध दिलं आणि नंतर त्याचा मृतदेह दोरीने बंद खोलीत लटकवल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बरेलीच्या फतेहगंज पश्चिम नगर पंचायतीशी संबंधित ही घटना आहे. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या तरुणाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून प्लॅन रचून पतीची हत्या केली आहे. एसपी मुकेश चंद्र मिश्रा म्हणाले की, केहर सिंह (३५) नावाच्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घरी लटकलेला आढळला.
दरवाजा आतून बंद होता. जेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला तेव्हा लोकांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. मात्र भावाने हत्येची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड पिंटू यांचं नाव समोर आलं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. पत्नीने चहामध्ये उंदीर मारण्याचं औषध मिसळल्याची कबुली दिली आहे.
ठाकुरद्वारा परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या केहरचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचं सांगण्यात येत आहे. लोकांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबल्याच्या खुणा असल्याचं उघड झाले आहे. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितलं की, केहरची पत्नी त्याच्या इच्छेविरुद्ध मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होती.
बुलंदशहरचा रहिवासी असलेला पिंटू नावाचा एक तरुण तिथे काम करत होता, तो अनेकदा तिच्यासोबत स्वयंपाकघरात राहून जेवण बनवत असे. कुटुंबातील सदस्यांनी असा आरोपही केला आहे की, जेव्हा केहरला दोघांमधील संबंधांबद्दल कळलं तेव्हा त्याने विरोध केला.
पोलीस चौकशीदरम्यान लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, केहर आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशीही घरातून भांडणाचे आवाज येत होते. याच दरम्यान, कटाचा भाग म्हणून सर्वात आधी पत्नीने उंदीर मारण्याचं विष दिलं आणि नंतर हत्या करण्यात आली, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.