भाईंदरच्या आॅर्केस्ट्रा बारमधून बारबाला, ग्राहकांसह ४५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 21:23 IST2018-10-22T21:22:46+5:302018-10-22T21:23:07+5:30
गुप्त खोलीत लपवलेल्या ६ बारबालांची सुटका

भाईंदरच्या आॅर्केस्ट्रा बारमधून बारबाला, ग्राहकांसह ४५ जणांना अटक
मीरारोड - भार्इंदर पूर्वेच्या प्राईम या आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या अश्लील नृत्य व बीभत्स प्रकाराची माहिती मिळताच पोलीसांनी टाकलेल्या धाडीत १० बारबालांसह ग्राहक, बार कर्मचारी, चालक - मालक अशा एकूण ४५ जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बारमध्ये ६ बारबालांना कोंदट अशा गुप्त खोलीत लपवुन ठेवले होते. परिणामी त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
पूर्वेला फाटकाजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये प्राईम नावाचा आॅर्केस्ट्रा बार आहे. या बारमध्ये अश्लिल व बीभत्स प्रकार चालत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारच्या मध्यरात्रीनंतर नवघरचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग, उपनिरीक्षक विजय टक्के व राठोड तसेच पोलीस पथकाने धाड टाकली. या धाडीत बारमध्ये चार बारबाला तोकड्या कपड्यात अश्लिल हावभाव करुन नाचत होत्या. तर पुरुष ग्राहक त्यांच्यावर नोटांची उधळण करत होते. पोलिसांनी या बारबालांसह बारचे कर्मचारी अशा १८ जणांना तर १६ ग्राहकांना अटक केली. बारमध्ये आणखी बारबाला असल्याची माहिती असल्याने त्यांचा शोध घेतला असता अत्यंत कोंदट व गुप्त खोलीत ६ बारबालांना लपवून ठेवल्याचे आढळून आले. बारचे चालक - मालक ललित राज पुरोहित, जगदिश शेट्टी, सुनील शेट्टी, महेश शेट्टी, जया ठाकुर यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.