"मला रुद्रची खूप आठवण येते, मी त्याच्याशिवाय..."; मुलाच्या आठवणीत वडिलांनी मृत्यूला कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:51 IST2025-03-10T12:48:37+5:302025-03-10T12:51:24+5:30
कनुभाई गेल्या २० वर्षांपासून बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांची विविध जिल्ह्यांमध्ये बदली झाली होती.

फोटो - आजतक
गुजरातमधील जुनागढ येथील सहकारी आणि ग्रामीण कृषी बँकेचे ५२ वर्षीय मॅनेजर कनुभाई यांनी त्यांच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांना कनुभाईंची एक सुसाईड नोट सापडली, जी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाने लिहिलेली होती. त्या चिठ्ठीत त्याने लिहिलं होतं की, "मला रुद्रची खूप आठवण येते आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, म्हणून मी मृत्यूला कवटाळत आहे."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनुभाई गेल्या २० वर्षांपासून बँकेत मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांची विविध जिल्ह्यांमध्ये बदली झाली होती. सध्या ते जुनागढ येथे तैनात होते आणि बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. सोमवारी त्यांनी याच गेस्ट हाऊसमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
सुसाईड नोटमध्ये कनुभाईंनी लिहिलं की, "मी मृत्यूला कवटाळत आहे. जेव्हा मी पायऱ्यांवरून पडलो तेव्हा मला माझ्या रुद्रची खूप आठवण येत होती. म्हणूनच मी आता जगू शकत नाही. तू आणि तुझ्या आईने शांततेत जगावं, कशाचीही काळजी करू नये. मी रुद्रशिवाय जगू शकत नाही."
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, कनुभाईंना दोन मुलं होती, त्यापैकी धाकटा मुलगा रुद्र याने दीड वर्षांपूर्वी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी कनुभाई त्यांच्या मुलाला एखाद्या गोष्टीसाठी ओरडले होते, त्यानंतर त्याने हे पाऊल उचललं. रुद्रच्या मृत्यूनंतर कनुभाई तणावाखाली होते आणि अखेर त्याच दुःखामुळे त्यांनी आत्महत्या देखील केली.
पोलिस आणि कुटुंबीयांच्या जबाबांवरून असं दिसून आलं की, कनुभाई त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरू शकले नव्हते. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.