"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:35 IST2025-05-02T16:34:32+5:302025-05-02T16:35:26+5:30
पत्नी गेल्या २ महिन्यांपासून तिच्या आईवडिलांच्या घरी होती आणि सासरच्या घरी येत नव्हती.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बांदा येथे पत्नीला कंटाळून एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पत्नी गेल्या २ महिन्यांपासून तिच्या आईवडिलांच्या घरी होती आणि सासरच्या घरी येत नव्हती, त्यामुळे तरुणाची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तो तणावाखाली होता आणि त्यातच त्याने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
तरुणाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ बनवला होता, ज्यामध्ये तो म्हणाला होता की, "माझी पत्नी, मेहुणी आणि सासू माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने मला मरण्यास भाग पाडलं. माझे भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतात. भावांनो, कृपया आई-वडिलांना समजावून सांगा, मी लवकरच परत येईन. मी देवाला प्रार्थना करेन की मला लवकर खाली पाठव."
"माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईवडिलांना आणि भावांना अजिबात त्रास देऊ नये. माझी पत्नी, मेहुणी आणि सासू यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी मला मरण्यास भाग पाडलं. हे लोक माझ्या आयुष्याशी खेळले आहेत. मला उद्ध्वस्त केलं. मी माझ्या बायकोवर खरं प्रेम केलं. म्हणूनच मी तिला सोडू शकत नाही, कारण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही."
घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस पथकांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम उपस्थित आहे, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
गिरवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रीगा गावात ही घटना घडली जिथे गावातील रहिवासी हबीबचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हबीबने स्वतःवर गोळी झाडली. त्याचा पत्नीशी काही महिन्यांपासून वाद सुरू होता. याशिवाय न्यायालयात एक खटला सुरू आहे, ज्यामुळे पत्नी २ महिन्यांपासून तिच्या पालकांच्या घरी आहे. तरुण मानसिक तणावाखाली होता. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.