वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:34 IST2025-12-21T17:32:43+5:302025-12-21T17:34:13+5:30
वीज बिल वसुली दरम्यान वीज विभागाच्या पथकावर ग्रामस्थांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात वीज बिल वसुली दरम्यान वीज विभागाच्या पथकावर ग्रामस्थांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण पैलानी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरोदर गावातील आहे. थकबाकीदाराच्या घरी बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकावर लाठ्या-काठ्या आणि विटा-दगडांनी मोठा हल्ला करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीज विभागाचे पथक सरकारच्या "वीज बिल मदत योजने" अंतर्गत गावात थकबाकी वसुलीसाठी गेलं होतं. याच दरम्यान एका थकबाकीदाराने बिल भरण्यास नकार दिला. त्यानंतर वाद वाढला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
पैलानी भागात तैनात असलेले वीज विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर किशन कुमार यांनी सांगितलं की, १९ डिसेंबर रोजी विभागीय पथक पिपरोदर गावात गेलं होतं. तिथे एका ग्राहकावर सुमारे ९० हजार रुपयांचं वीज बिल थकलं होतं. सरकारी योजनेअंतर्गत त्याला ६० हजार रुपयांची सूट देण्यात आली होती आणि केवळ ३० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले होते.
थकबाकीदार संतप्त झाला. त्याने आपले वडील आणि कुटुंबातील महिलांसह मिळून वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नियमानुसार वीज कनेक्शन कापण्याची कारवाई पथकाने सुरू करताच, आरोपी आणि त्याचे नातेवाईक अधिकच आक्रमक झाले. किशन कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी लाठी-काठ्या काढल्या आणि वीज पथकावर विटा-दगड फेकायला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करण्यात आला.
वीज मीटर तारांसह तोडण्यात आले आणि सरकारी कागदपत्रं व फाईल्सही फाडून टाकल्या. थोड्या वेळाने परिस्थिती इतकी बिघडली की, वीज विभागाच्या पथकाला कसाबसा आपला जीव वाचवून तिथून पळ काढावा लागला. या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.