Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:50 IST2025-07-22T18:49:32+5:302025-07-22T18:50:10+5:30
Chhangur Baba : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील छांगुर बाबा धर्मांतर सिंडिकेटबद्दल सतत धक्कादायक खुलासे होत आहेत.

Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील छांगुर बाबा धर्मांतर सिंडिकेटबद्दल सतत धक्कादायक खुलासे होत आहेत. विश्व हिंदू रक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाळ राय यांनी दावा केला की, पीडित महिलांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मंगळवारी लखनौमध्ये त्यांनी सांगितलं की, छांगुर बाबाचे गुंड महिलांना उघडपणे धमक्या देत आहेत. "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील" असं म्हणत आहेत.
गोपाळ राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, छांगुर बाबा जेलमध्ये असला तरी त्याचं सिंडिकेट अजूनही पूर्णपणे सक्रिय आहे. धर्मांतर रॅकेट फक्त पडद्यामागे गेलं आहे. पूर्वी मुलींना फसवून त्यांचं ब्रेनवॉश करणारी गँग आज त्यांना धमकावत आहे. त्यांना केस मागे घ्यायला सांगत आहे आणि कोणतीही साक्ष देऊ नका असंही म्हणत आहेत.
छांगुर बाबाच्या साथीदारांकडून येणाऱ्या या धमक्यांमुळे पीडित मुली आणि महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यांना फोन कॉल, मेसेज आणि कधीकधी थेट भेटून धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाची निष्क्रियता या गँगला मोकळीक देत असल्याचा आरोपही गोपाळ यांनी केला. जर पोलीस आणि प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही तर मुलींचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं असं म्हटलं आहे.
यापूर्वी बलरामपूर आणि मेरठसह अनेक जिल्ह्यांतील पीडित महिलांनीही छांगुर बाबाची टोळी अजूनही सक्रिय असल्याचा आरोप केला होता. त्यांचा दावा आहे की, छांगुर बाबा पकडला गेला आहे, परंतु त्याचं नेटवर्क अजूनही प्रत्येक गावात आहे. त्यांना सतत धमक्या मिळत आहेत. अनेक मुली अजूनही त्याच्या ताब्यात आहेत. त्यांचे लोक बेपत्ता आहेत, परंतु लोकांना पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही.