बदलापुरात बारमध्ये थरार, तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 23:07 IST2021-12-18T23:06:00+5:302021-12-18T23:07:36+5:30
या घटनेनंतर सॅम्युएलला बदलापूरच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी चेतन वाघेरे याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापुरात बारमध्ये थरार, तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार
बदलापूर- भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना बदलापुरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या हल्ल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
बदलापूरच्या हेंद्रेपाड्यात राहणारा चेतन वाघेरे उर्फ बब्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी चेतन आणि एब्राहिम नामक एका तरुणाचा वाद सुरू होते. त्या वादात सॅम्युएल जॉन नामक तरुणाने मध्यस्थी करत वाद सोडवला. यानंतर चेतन याने सॅम्युएलला बियर पाजण्यास सांगितले. त्यामुळे चेतनला घेऊन सॅम्युएल हा जवळच्याच आदिती बारमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर चेतन हा बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने किचनच्या परिसरात गेला आणि येताना किचनमधून कोयता घेऊन आला. त्याने थेट सॅम्युएलच्या गळ्यावर आणि दंडावर वार केले.
या घटनेनंतर सॅम्युएलला बदलापूरच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी चेतन वाघेरे याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ही संपूर्ण घटना बारच्या आतमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. तर दुसरीकडे या सगळ्यात हॉटेल चालकाने थेट एखाद्या ग्राहकाला कोयता दिलाच कसा? असा प्रश्न जखमी सॅम्युएलने उपस्थित केला असून हॉटेलचालकावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.