Bengaluru Crime: दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपणच त्यात पडतो या म्हणीचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना कर्नाटकच्या होस्कोटे तालुक्यातील गोविंदपुरा गावात घडली आहे. कौटुंबिक वादातून मोठ्या भावाचे घर जाळण्यासाठी गेलेला एक व्यक्ती स्वतःच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपी मुनिराजू हा गेल्या ८ वर्षांपासून गावात चिट फंडचा व्यवसाय करत होता. मात्र, या व्यवसायात त्याला मोठे नुकसान झाले आणि तो कर्जाच्या विळख्यात अडकला. गावकरी पैशांसाठी तगादा लावू लागल्याने मुनिराजूने आपल्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन विकून कर्ज फेडण्याचा प्रस्ताव ठेवला. कुटुंबाने आधीच जमिनीचा एक भाग विकून काही पैसे दिले होते, मात्र उरलेली जमीन विकण्यास मोठा भाऊ रामकृष्ण याने ठाम नकार दिला. याच रागातून मुनिराजूने आपल्या भावाचा काटा काढण्याचे आणि त्याचे घर जाळण्याचे भयानक कारस्थान रचले.
मध्यरात्री रचला मृत्यूचा सापळा
७ जानेवारीच्या मध्यरात्री मुनिराजू पेट्रोल घेऊन रामकृष्ण यांच्या घराजवळ पोहोचला. त्याने सुरुवातीला घराचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद केला, जेणेकरून कोणालाही बाहेर पडता येऊ नये. त्यानंतर त्याने घराच्या परिसरात पेट्रोल शिंपडण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, जशी त्याने आग लावली, तसा आगीचा मोठा भडका उडाला. दुर्दैवाने, पेट्रोल शिंपडताना काही थेंब मुनिराजूच्या कपड्यांवर आणि हातावर पडले होते, ज्यामुळे क्षणार्धात तो स्वतःच आगीच्या विळख्यात सापडला.
आरडाओरड झाल्याने वाचले प्राण
स्वतःला आग लागल्यानंतर मुनिराजू वेदनेने विव्हळत ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे नागरिक तातडीने मदतीला धावले. त्यांनी आग विझवून मुनिराजूला बाहेर काढले. त्याला तातडीने होस्कोटे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला बंगळुरूच्या व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याप्रकरणी तिरुमलशेट्टीहल्ली पोलीस ठाण्यात मुनिराजू विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे, त्याला डिस्चार्ज मिळताच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Web Summary : In Karnataka, a man attempting to burn his brother's house after a family dispute was caught in the flames himself. He is hospitalized, and police are investigating the attempted murder.
Web Summary : कर्नाटक में, पारिवारिक विवाद के बाद अपने भाई का घर जलाने की कोशिश करने वाला व्यक्ति खुद आग में फंस गया। वह अस्पताल में है, और पुलिस हत्या के प्रयास की जांच कर रही है।