३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:27 IST2025-09-25T12:27:41+5:302025-09-25T12:27:57+5:30
या प्रकरणात पीडित विद्यार्थिनींचे महत्त्वाचे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जप्त केली जात होती, जेणेकरून त्या आवाज उठवू शकणार नाहीत किंवा संस्था सोडून जाऊ शकणार नाहीत.

३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
देशाची राजधानी दिल्लीतील वसंत कुंज येथील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली ज्याने देशभरात खळबळ माजवली. श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या प्रमुखानेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे, या कृत्यात संस्थेचा डीन आणि दोन महिला कर्मचारीदेखील सामील असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
या संस्थेचा प्रमुख, स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने संस्थेच्या तळमजल्यावरच लैंगिक शोषणाचे अड्डे तयार केले होते, असा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थिनींचे महत्त्वाचे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जप्त केली जात होती, जेणेकरून त्या आवाज उठवू शकणार नाहीत किंवा संस्था सोडून जाऊ शकणार नाहीत.
हरिद्वारमध्येही अत्याचार
आरोपी स्वामी चैतन्यानंदने आपली नवी लक्झरी कार खरेदी केल्यानंतर विशेष पूजेच्या बहाण्याने अनेक विद्यार्थिनींना हरिद्वारला घेऊन गेल्याचा आरोप आहे. परत येताना त्याने या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे म्हटले जात आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये डीन आणि दोन महिला कर्मचाऱ्यांचीही सामील असल्याचे उघड झाले आहे. पीडितांचे जबाब आणि पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा उलगडा कसा झाला हे देखील धक्कादायक आहे. १ ऑगस्ट रोजी भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयातून एका ग्रुप कॅप्टन अधिकाऱ्याने एक ई-मेल पाठवून या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारी कळवल्या. याच संस्थेत वायुसेनेच्या काही अधिकाऱ्यांच्या मुलीही शिकत होत्या आणि त्यांनीच आपल्या पालकांकडे याबद्दल तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
पोलीस कारवाई सुरू
या प्रकरणी, विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर २ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२०/२०२५ दाखल करण्यात आला. त्यानंतर, ४ आणि ५ ऑगस्ट रोजी आणखी पुरावे पोलिसांना देण्यात आले. आतापर्यंत एकूण ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापैकी १७ विद्यार्थिनींनी थेट स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, आरोपी त्यांना अश्लील मेसेज पाठवत होता, अश्लील भाषा वापरत होता आणि शारीरिक छेडछाड करण्याचा प्रयत्न करत होता.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.