बाबा सिद्दीकींच्या मोबाइल डिटेल्सची चोरी; पोलिसांनी दिल्लीतून केली एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 05:49 IST2025-07-08T05:49:05+5:302025-07-08T05:49:50+5:30
आरोपीने तो मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करून त्याद्वारे फसवणूक करण्याचा कट रचला होता.

बाबा सिद्दीकींच्या मोबाइल डिटेल्सची चोरी; पोलिसांनी दिल्लीतून केली एकाला अटक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचे मोबाइल डिटेल्स चोरून दुसऱ्या सीमकार्डवर तो नंबर सुरू करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीतून एका संशयिताला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याचे नाव विवेक सब्रवाल असून, तो सायबर फसवणूक करण्याच्या प्रयत्नात होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी कुटुंबीयांनी बाबा सिद्दीकी यांचा मोबाइल क्रमांक सुरूच ठेवला होता. त्याचा वापर त्यांचे कुटुंबीय करीत असलेल्या दोन व्यवसायाशी संलग्न आहे. दरम्यान, २४ जून रोजी दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने एक ई-मेल आला होता. त्यात बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल क्रमांकासाठी अधिकृत स्वाक्षरी हक्काबाबत विचारणा करण्यात आली होती. या मेलबरोबर शेहझीन सिद्दीकी यांचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, वस्तू सेवा क्रमांक (जीएसटी) आणि कुटुंबाच्या कंपनीचे लेटरहेडही वापरले होते. आरोपीने तो मोबाइल क्रमांक दुसऱ्या सीमकार्डवर सुरू करून त्याद्वारे फसवणूक करण्याचा कट रचला होता; पण कंपनीने संबंधित व्यक्तीचा अर्ज प्राप्त झाल्याचे ई-मेलद्वारे सिद्दीकीची मुलगी डॉ. अर्शिया यांना कळवल्याने हा प्रकार लक्षात आला. याबाबत डॉ. अर्शिया यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीवर यापूर्वीही गुन्हे
आरोपी सब्रवाल हा दिल्लीच्या बुराडी परिसरातील रहिवासी असून, त्याच्या विरोधात काही सायबर गुन्हेही दाखल आहेत. ज्यापैकी एका प्रकरणातून तो जामिनावर सुटला होता. आम्ही दिल्लीतील स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्याला रविवारी सकाळी दिल्लीतून ताब्यात घेत सोमवारी मुंबईला आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.