अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात, मुंबई गुन्हे शाखेने हत्येच्या कटात वापरल्या गेलेल्या मनी ट्रेलची माहितीही उघड केली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी जी १७ लाखांची सुपारी दिली होती, त्याच्यासाठी सर्वाधिक फंडिंग हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून झाल्याचं गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात उघड झालं आहे.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासादरम्यान समोर आलेल्या मनी ट्रेलनुसार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित लोकांनी अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांच्या सूचनेनुसार कर्नाटक बँकेत उघडलेल्या खात्यात पैसे जमा केले होते.
आरोपपत्रानुसार, शुभम लोणकरला गुजरातमधील आणंद येथील कर्नाटक बँकेत आरोपी सलमान वोहराच्या नावाने उघडलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, उत्तर प्रदेशातील लॉरेन्स बिश्नोई गँगचा स्लीपर सेल वेगवेगळ्या सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन) वापरून तिथून अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यात पैसे पाठवत होता.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, बाबा सिद्दिकी यांच्या सुपारीसाठी सुमारे ६० ते ७० टक्के पैसे या दोन राज्यांमधून मिळाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुपारीसाठी १७ लाखांचं फंडिंग देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून करण्यात आलं होतं, आतापर्यंत तपासात परदेशातून फंडिंग आल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
तपासात असंही समोर आलं आहे की, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील काही पैसे हवालाद्वारे आरोपींपर्यंत पोहोचले होते. गुन्हे शाखेने कर्नाटक बँक खात्यांमधून महाराष्ट्रातून आलेल्या फंडिंगचा शोध घेतला आहे परंतु उत्तर प्रदेशातून आलेल्या फंडिंगच्या मनी ट्रेलचे दुवे जोडण्यात त्यांना यश आलेलं नाही.