Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:48 IST2024-12-28T11:48:15+5:302024-12-28T11:48:15+5:30
Baba Siddique Murder Case : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे.

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी काही दिवसांत आरोपपत्र दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी एकूण २६ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, ज्यामध्ये शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई अशी तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे. मुंबई गुन्हे शाखेला हत्येमागील कारणाबाबत अद्याप ठोस काहीही सापडलं नसल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. मुंबई गुन्हे शाखेने एसआरए वादाच्या अँगलनेही तपास केला परंतु पोलिसांना असं काही सापडलेलं नाही.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी हे अभिनेता सलमान खानच्या जवळचे होते. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना हत्येमागचं नेमकं कारण माहीत नाही. त्यांना फक्त हत्या करा इतकंच सांगण्यात आलं होतं. तसेच त्याबदल्यात पैसे मिळतील असंही सांगितलं होतं.
या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांना अटक होईपर्यंत हत्येमागचं नेमकं कारण समोर येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दसऱ्याच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केलं.