Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 18:44 IST2024-11-06T18:43:52+5:302024-11-06T18:44:08+5:30
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गौरव विलास अप्पुने (२३) नावाच्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याची पुष्टी झाली आहे. त्याला हत्येची पूर्ण माहिती असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणातील ही १६वी अटक आहे.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तपासादरम्यान हत्येचा कट रचण्यासाठी गौरव हा अनेकदा इतर आरोपींना भेटला होता. शूटर्सच्या पहिल्या बॅचच्या देखील संपर्कात होता, ज्यांना याआधी बाबा सिद्दिकी यांना मारण्याची सुपारी दिली होती. गुन्हे शाखेचं पथक गौरवला न्यायालयात हजर करणार आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बाबा सिद्दिकी यांचे अभिनेता सलमान खानशी जवळचे संबंध असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान आता सिद्दिकी यांच्या हत्याकांडातील एका साक्षीदाराला ५ कोटींची खंडणी आणि धमकीचा फोन आला होता.
साक्षीदाराने पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी फोन करणाऱ्याने दिली होती. पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.