राम मंदिर उडवण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास; कुख्यात गुंडाने हाय-सिक्युरिटी सेलमध्येच संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:05 IST2026-02-10T16:50:05+5:302026-02-10T17:05:13+5:30
UP Crime: उत्तर प्रदेशातील दहशतवाद्याचा तुरुंगात खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अयोध्या येथील राम मंदिर उडवण्याचा कट ...

राम मंदिर उडवण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास; कुख्यात गुंडाने हाय-सिक्युरिटी सेलमध्येच संपवलं!
UP Crime: उत्तर प्रदेशातील दहशतवाद्याचा तुरुंगात खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अयोध्या येथील राम मंदिर उडवण्याचा कट रचल्याचा आरोप असलेला अल-कायदाचा दहशतवादी अब्दुल रहमान (२०) याची फरीदाबादच्या नीमका तुरुंगात हत्या करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हाय सिक्युरिटी बॅरेकमध्ये सोबत असलेल्या अरुण चौधरी उर्फ अब्बू जट या गुंडानेच ही हत्या केली.
रविवारच्या मध्यरात्री फरीदाबादच्या नीमका तुरुंगातील अति-सुरक्षित सेलमध्ये अब्दुल रहमान आणि अरुण चौधरी यांना एकत्र ठेवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी अरुणने एका टोकदार वस्तूने अब्दुलवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात अब्दुल गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली. अब्दुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तुरुंगातील सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोण होता अब्दुल रहमान?
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला अब्दुल रहमान रिक्षाचालक होता. त्याला मार्च २०२५ मध्ये गुजरात एटीएस आणि हरियाणा एसटीएफने फरीदाबादमधून अटक केली होती. तो अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा कुख्यात हस्तक अबू सूफियान याच्या संपर्कात होता. अटकेच्या वेळी त्याच्याकडून दोन जिवंत हँड ग्रेनेड हस्तगत करण्यात आले. तपासादरम्यान, त्याला ४ एप्रिल रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिर परिसरात घातपात घडवण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली. टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर भडकाऊ व्हिडिओ टाकून तो दहशतवाद्यांच्या नजरेत भरला होता, जिथून त्याचे ब्रेन वॉश करण्यात आले.
आरोपी अरुण चौधरीचा इतिहास
अब्दुलची हत्या करणारा अरुण चौधरी उर्फ अब्बू जट हा जम्मूचा रहिवासी असून त्याच्यावर अनेक हत्या आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. सांबा येथील अक्षय शर्मा हत्याकांडाने तो चर्चेत आला होता. दोन वर्षांपूर्वी त्याला जम्मूच्या कठुआ तुरुंगातून फरीदाबादच्या नीमका तुरुंगात हलवण्यात आले होते. त्याने यापूर्वी तुरुंग प्रशासनावर लाच घेण्याचे आरोपही केले होते.