Attempt to kill wife wearing jeans pants, T-shirt; Husband arrested | जीन्स पॅन्ट, टी-शर्ट घालणाऱ्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; पतीला अटक
जीन्स पॅन्ट, टी-शर्ट घालणाऱ्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; पतीला अटक

डोंबिवली : जीन्स पॅण्ट आणि टी-शर्ट घालून कामाला गेल्याच्या रागातून पतीने पत्नीला गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोपर परिसरात घडली. गळा आवळल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला असावा, असा समज होऊन रामनगर पोलीस ठाण्यात हजर झालेल्या पतीला पोलिसांनीअटक केली.

डोंबिवली पूर्वेतील कोपर परिसरात सुधीर जाधव (३३) हे पत्नी सुजाता (३०) सोबत राहायला आहेत. मागील काही वर्षांपासून घरातील कामांवरून तसेच सुजाताच्या कपडे घालण्यावरून सुधीर नेहमी तिच्याशी भांडण करत होता. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास सुजाता कामावरून घरी परतली. यावेळी, सुजाताने घातलेल्या जीन्स पॅण्ट आणि टी-शर्टवरून सुधीरने तिच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली.

याच वादातून सुधीरने गळा दाबून सुजाताला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे, चक्कर आल्याने खाली पडलेली सुजाता मृत झाल्याचे सुधीर याला वाटले. त्यामुळे घाबरलेला सुधीर रामनगर पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. तिकडे बेशुद्ध पडलेल्या सुजाताला तिच्या शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. गंभीर प्रकृती असलेल्या सुजातावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी चौकशी केली असता एकूणच प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सुजाताने दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पती सुधीरला अटक केली.

Web Title: Attempt to kill wife wearing jeans pants, T-shirt; Husband arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.