'उद्या सकाळी ये...' ; पोलिसांनी हटकलं, गँगरेप पीडित अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 19:42 IST2023-07-31T19:36:29+5:302023-07-31T19:42:04+5:30
मुलीवर दोघांनी केला बलात्कार, नातेवाईक पोलिसांपुढे हतबल

'उद्या सकाळी ये...' ; पोलिसांनी हटकलं, गँगरेप पीडित अल्पवयीन मुलीने संपवलं जीवन
Uttar Pradesh Crime, Shocking News: उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील एका गावात रविवारी रात्री एका अल्पवयीन मुलीवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. नातेवाईक तक्रार घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले असता त्यांना धमकावण्यात आले. पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर तातडीने कारवाई करण्याऐवजी त्यांना सकाळी येण्यास सांगितले, असा आरोप नातेवाईकांनी केला. या साऱ्या गोंधळात पीडिता प्रचंड दुखावली गेली आणि तिने स्वत:ला फाशी लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
दोघांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करून न घेतल्याने, तिने आत्महत्या केली. मुलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये दोन तरुणांवर बलात्काराचा आरोप केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्रीच कारवाई केली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कबूल केले की, मृताच्या नातेवाईकांनी घटनेच्या दिवशी रात्री कप्तानगंज पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल राहुल कुमार यांना तोंडी माहिती दिली होती, परंतु त्यांनी स्टेशन प्रभारींना माहिती दिली नाही. या प्रकरणाबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवालाच्या आधारे कॉन्स्टेबल राहुल कुमार यांना तत्काळ निलंबित केले आहे. यासोबतच त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पोलीस कोठडीत एका आरोपीची चौकशीही केली जात होती.