दादरमध्ये महिला सफाई कामगारावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 21:42 IST2018-08-09T21:41:36+5:302018-08-09T21:42:27+5:30
शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, गजानन विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस अधिक तपास करत आहेत.

दादरमध्ये महिला सफाई कामगारावर जीवघेणा हल्ला
मुंबई - महापालिकेच्या जी नार्थ विभागात पैशांच्या देवाणघेवाणीवरून सफाई कामगार महिलेवर सहकाऱ्यानेच चाकू हल्ला केल्याची थक्कादायक घटना आज सकाळी ६.३० वाजता घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात आरोपी गजानन चव्हाण या बीएमसी कामगाराविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची महािती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत गायकवाड यांनी दिली.
पालिकेच्या जी नार्थ विभागातील घनकचरा विभागात गजानन आणि पीडित महिला हे दोघेही एकत्र काम करतात. काही महिन्यांपूर्वी महिलेने आर्थिक अडचणींमुळे गजानन यांच्याकडून पैसे उधारीवर घेतले होते. मात्र, पीडित महिला वर्ष उलटून गेले तरीही पैसे देत नव्हती. वारंवार मागून ही ती उडवा - उडवीची उत्तरे देत असल्याने गजाननचा राग अनावर झाला होता. गुरूवारी सकाळी दोघेही कामावर सकाळी ६.३० च्या सुमारास आले होते. त्यावेळी दोघांमध्ये पैशांवरून पुन्हा वाद झाला. याच वादातून गजाननने महिला स्वच्छता गृहात जाऊन महिलेवर चाकूने हल्ला केला. वेळीच पालिकेतल्या उपहार गृहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलेला वाचवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यावेळी जखमी महिलेने केलेल्या आरडाओरडा केल्यानंतर इतर सहकाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, गजानन विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस अधिक तपास करत आहेत.