An attack on a family going to the hospital out of anger for not giving a side | साईड न दिल्याच्या रागातून दवाखान्यात जाणाऱ्या कुटुंबियावर हल्ला

साईड न दिल्याच्या रागातून दवाखान्यात जाणाऱ्या कुटुंबियावर हल्ला

ठळक मुद्देहेमंत संतोष चौधरी व त्याचा भाऊ जगदीश (रा.आदर्श नगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत हा एस.टी.महामंडळात वाहक आहे.

जळगाव :  नाशिक येथे कारने दवाखान्यात जात असलेल्या कुटुंबियांवर साईड न दिल्याच्या रागातून मोहाडी रस्त्यावर अडवून लोखंडी रॉड व दगडांचा मारा करुन गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता घडली. यात सुरेश प्रतापराव साळुंखे, त्यांचे भाऊ अरुण साळुंखे, लताबाई साळुंखे व उर्मिला साळुंखे (सर्व रा.विठ्ठल पेठ) हे चार जण जखमी झाले आहेत. दगडफेकीमुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, हेमंत संतोष चौधरी व त्याचा भाऊ जगदीश (रा.आदर्श नगर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत हा एस.टी.महामंडळात वाहक आहे.


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सुरेश प्रतापराव साळुंखे यांना कमरेचा त्रास असल्याने नाशिक येथे शस्त्रक्रीयेची १ मार्चची तारीख मिळाली आहे. त्यासाठी मुलगा योगेश सुरेश साळुंखे, त्याचे काका अरुण साळुंखे, आई लताबाई, काकु उर्मिला साळुंखे, वैशाली साळुंखे असे शनिवारी कारने (क्र.एम.एच १९ एच.के ३३९५) नाशिक जाण्यासाठी दुपारी निघाले. दुपारी १.४० वाजेच्या सुमारास मोहाडी रस्त्याजवळ आल्यावर मागून दुचाकीवर दोन जण आले आणि कारसमोर आडवे झाले. कार चालक अरुण साळुंखे यांना इच्छादेवी चौकापासून आम्हाला साईड का दिली नाही? म्हणून जाब विचारुन शिवीगाळ केली.

 समजाविण्याचा प्रयत्न केला अन‌् हल्ला
 कारमधील सर्वांनी दुचाकीस्वारांना समजविण्याचा प्रयत्न केला असता एकाने सुरेश साळुंखे आणि अरूण साळुंखे या दोन्ही भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच लताबाई यांच्या हाताचे बोटास दुखापत केली. हेमंत चौधरी याने दगडांचा मारा सुरु केला, त्यात सुरेश साळुंखे यांच्या डोक्याला दगड लागून प्रचंड रक्तस्त्राव झाला. यावेळी दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, नितीन पाटील, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, किशोर बडगुजर यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत जखमी रुग्णालयात गेले होते तर हेमंत व जगदीश या दोघांना घरातून ताब्यात घेतले. सायंकाळी योगेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला

Web Title: An attack on a family going to the hospital out of anger for not giving a side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.