Aryan Khan Arrested: बदललेल्या नियमांचा फायदा झाला; १५ मिनिटांच्या भेटीत शाहरूख खान आर्यनला काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 15:31 IST2021-10-21T14:37:16+5:302021-10-21T15:31:21+5:30
Shah Rukh Khan met Aryan Khan in Mumbai's Arthur Road Jail: शाहरुख खान आणि आर्यनची भेट जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील विजिटींग रुमजवळ झाली.

Aryan Khan Arrested: बदललेल्या नियमांचा फायदा झाला; १५ मिनिटांच्या भेटीत शाहरूख खान आर्यनला काय म्हणाला?
मुंबई – क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी(Mumbai Cruise Rave Party) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान(Aryan Khan) NCB च्या अटकेत आहे. २ ऑक्टोबरला आर्यनला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत आर्यनला कोर्टात जामीन मिळाला नाही. त्यामुळे आर्यन खानची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता.
शाहरुख खानसोबत तिची मॅनेजर पूजा ददलानीही उपस्थित होती. जेल पोलीस अधीक्षकानुसार, शाहरुख खान जेव्हा जेलमध्ये आला तेव्हा त्याचं आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानंतर त्याला टोकनसह आतमध्ये पाठवलं. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. चर्चेवेळी दोघांमध्ये काचेची भिंत होती. दोन्ही बाजूने इंटरकॉम होता. कुठल्याही सामान्य आरोपीच्या नातेवाईकांना भेटायला जातात तसं शाहरूखनं आरोपी आर्यनची भेट घेतली. त्याला कुठलीही विशेष ट्रिटमेंट दिली नाही. मुलाखतीची वेळ संपताच शाहरूख स्वत:चा बाहेर पडला.
शाहरुख खान आणि आर्यनची भेट जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील विजिटींग रुमजवळ झाली. शाहरुख खान आर्यनला पाहताच भावूक झाला होता परंतु स्वत:च्या भावनेवर नियंत्रण ठेवत शाहरुख गंभीर असल्याचं दाखवून देत होते. शाहरुख-आर्यन जेलच्या भेटीवेळी ५ अधिकारी उपस्थित होते. त्यात एक डेप्युटी जेलरही होता. शाहरुखने आर्यनला धीर देत म्हणाला की, जामीन मिळेल. प्रकरण हायकोर्टात आहे. सर्वकाही ठीक होईल. या भेटीवेळी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.
#WATCH Actor Shah Rukh Khan reaches Mumbai's Arthur Road Jail to meet son Aryan who is lodged at the jail, in connection with drugs on cruise ship case#Mumbaipic.twitter.com/j1ozyiVYBM
— ANI (@ANI) October 21, 2021
आर्थर रोड जेलमधील अन्य कैद्यांच्या नातेवाईकांची बाहेर रांग लागली होती. शाहरुख खान आत जाताच इतरांना प्रतिक्षा करावी लागली. कोरोना काळात जेलमधील कैद्यांना भेटण्यावर बंदी होती. मात्र कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथील होत असल्याने २१ ऑक्टोबरपासून नियम बदलण्यात आले. नातेवाईकांना कैद्यांची भेट घेता येत होती. शाहरुख खानला या बदललेल्या नियमांचा फायदा झाला. कोविडमुळे केवळ व्हिडीओ कॉलद्वारेच कैद्यांना भेटता येत होते. आर्यन जेलमध्ये असल्यापासून शाहरुख आणि गौरी खान दोघंही आर्यनशी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधत होते. जेल अधीक्षकानुसार, आठवड्यातून केवळ एकदाच नातेवाईक किंवा वकील आरोपीची मुलाखत घेऊ शकतात. भेटीवेळी दोन जण उपस्थित राहू शकतात.
कोविड संक्रमणामुळे मार्च २०२० पासून जेलमधील कैद्यांना कुणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. आता कोविड १९ नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. त्यामुळे जेलमधील निर्बंधही उठवण्यात आले आहेत. जेलमध्ये बंद असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी कोविड नियमांचे पालन करावं लागतं. भेटायला जाणाऱ्या व्यक्तीचं तापमान तपासलं जातं. जर तापमान सामान्य असेल जेलच्या आतमध्ये पाठवलं जातं. त्याशिवाय मास्क घालणंही बंधनकारक आहे.