कोट्यवधींचा घोटाळा करणारा संस्कार ग्रुपचा मास्टर माईंड जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:44 IST2019-10-12T16:34:13+5:302019-10-12T16:44:46+5:30
दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून संस्कार ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

कोट्यवधींचा घोटाळा करणारा संस्कार ग्रुपचा मास्टर माईंड जेरबंद
पिंपरी : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपचा संस्थापक व या घोटाळ्याच्या मास्टर माईंड जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्यासह त्याची पत्नी व मेव्हण्यालाही इंदूर येथून अटक करण्यात आली. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
संस्कार ग्रुपचा संस्थापक वैकुंठ प्रल्हाद कुंभार, पत्नी राणी वैकुंठ कुंभार (दोघेही रा. आळंदी, ता. खेड) व त्याचा मेव्हणा रामदास शिवले असे आरोपींची नावे आहेत. या आधी अजय लेले, शिवाजी ढमढेरे व कमल शेळके या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून संस्कार ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र गुंतवणूकदारांना लाभ मिळाला नाही. या प्रकरणी फसवणूक तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) अनुसार जानेवारी २०१७ मध्ये दिघी पोलीस ठाण्यात संस्कार ग्रुपच्या पदाधिकाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वैकुंठ कुंभार, राणी कुंभार तसेच कमल ज्ञानेश्वर शेळके (रा. वडमुखवाडी, ता. हवेली) यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र व उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तेव्हापासून हे तिघेही फरारी होते. मात्र आरोपी कमल शेळके यांना दिघी पोलिसांनी २१ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करून कारागृहात रवानगी केली.
..................