पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:55 IST2025-08-05T11:55:09+5:302025-08-05T11:55:45+5:30
Crime UP : पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका पित्याने आपल्या दोन लहान मुलांना गंगेत फेकले आणि नंतर स्वतःही नदीत उडी मारली. पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
नेमके काय घडले?
ही घटना वाराणसी जिल्ह्यातील रिंग रोडवरील बभनपुरा पुलावर घडली. चांदपूर येथील रहिवासी असलेल्या दुर्गा सोनकर यांचा त्यांच्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर संतापलेल्या आणि नैराश्यात गेलेल्या दुर्गाने आपला सात वर्षांचा मुलगा संदीप आणि पाच वर्षांचा मुलगा आशिष यांना घेऊन घर सोडले.
बभनपुरा पुलावर पोहोचल्यावर त्याने आधी दोन्ही मुलांना गंगेत फेकले आणि नंतर स्वतःही नदीत उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
पिता बचावला, मुलांचा शोध सुरू
दुर्गा सोनकर यांना मुस्तफाबाद गावाजवळ काही गावकऱ्यांनी पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, दोन्ही मुलांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. एनडीआरएफच्या (NDRF) टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलांचा शोध सुरू केला, परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. यामुळे, अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.