७ वर्षांच्या प्रेमानंतर पत्नीचे ७२ तुकडे; इंजिनिअर नवऱ्याची जन्मठेप कायम; नैनीताल हायकोर्टाचा मोठा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:42 IST2025-12-20T14:38:10+5:302025-12-20T14:42:05+5:30
उत्तराखंडमधील अनुपमा गुलाटी हत्या प्रकरणामध्ये अखेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला.

७ वर्षांच्या प्रेमानंतर पत्नीचे ७२ तुकडे; इंजिनिअर नवऱ्याची जन्मठेप कायम; नैनीताल हायकोर्टाचा मोठा निकाल
Anupama Gulati Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या आणि श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या अनुपमा गुलाटी हत्या प्रकरणामध्ये अखेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे ७२ तुकडे करणाऱ्या राजेश गुलाटीची जन्मठेपेची सजा नैनीताल उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात राजेशने अपील केले होते, मात्र त्याची क्रूरता पाहता हायकोर्टाने त्याला कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.
राजेश गुलाटी हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. राजेश आणि अनुपमा यांची प्रेमसंवादाची सुरुवात १९९२ मध्ये झाली होती. ७ वर्षांच्या अफेअरनंतर १० फेब्रुवारी १९९९ रोजी त्यांनी लग्न केले. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. २००० मध्ये हे जोडपे अमेरिकेला स्थायिक झाले. मात्र, तिथेच त्यांच्या नात्यात वादाची ठिणगी पडली. २००३ मध्ये अनुपमा भारतात परतली, पण २००५ मध्ये राजेशने तिला पुन्हा अमेरिकेला नेले. तिथे त्यांना जुळी मुले झाली. २००८ मध्ये हे कुटुंब देहराडूनमध्ये परतले, पण इथूनच या नात्याचा अंत रक्ताने झाला.
१७ ऑक्टोबरची ती थरारक रात्र
देहराडूनमध्ये आल्यानंतर दोघांमधील भांडणे विकोपाला गेली होती. घरगुती हिंसाचारामुळे न्यायालयाने राजेशला अनुपमाला दरमहा २० हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने केवळ एकच महिना पैसे दिले. १७ ऑक्टोबर २०१० रोजी याच पैशांवरून झालेल्या वादात राजेशने अनुपमाला इतक्या जोरात कानाखाली मारली की तिचे डोके भिंतीवर आदळले. अनुपमा बेशुद्ध पडताच पकडले जाण्याच्या भीतीने राजेशने तिचा गळा आवळून खून केला.
करवत, फ्रीजर आणि ७२ तुकडे!
हत्येपेक्षाही भयानक होता तो पुरावा नष्ट करण्याचा कट. राजेशने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे बाजारातून एक इलेक्ट्रिक करवत खरेदी केली. त्याने स्वतःच्या पत्नीच्या मृतदेहाचे ७२ तुकडे केले. दुर्गंधी येऊ नये म्हणून एक मोठा डीप फ्रीजर विकत घेतला. मांसाचे तुकडे प्लास्टिक पिशव्यांत भरून फ्रीजरमध्ये लपवले. तो दररोज मृतदेहाचे काही तुकडे मसुरी डायव्हर्जनजवळील नाल्यात फेकून द्यायचा. हा प्रकार कित्येक महिने सुरू होता.
अनुपमा बेपत्ता असताना राजेश मुलांना सांगायचा की आई नानीकडे गेली आहे. तो सासरच्यांना ईमेल पाठवून दिशाभूल करायचा. मात्र, अनुपमाच्या भावाला संशय आला. त्याने आपल्या एका मित्राला पासपोर्ट कर्मचारी बनवून राजेशच्या घरी पाठवले. राजेशच्या उत्तरांमधील विसंगतीमुळे सत्य समोर आले. १२ डिसेंबर २०१० रोजी जेव्हा पोलिसांनी घर गाठले आणि डीप फ्रीजर उघडला, तेव्हा तिथे जे दिसले ते पाहून पोलीस अधिकारीही हादरले.
करिअरमधील सर्वात भयानक केस
या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक गणेश सिंह मर्तोलिया म्हणाले होते की, "अशा प्रकारे मृतदेहाचे तुकडे करणारा माणूस सामान्य मानसिकतेचा असूच शकत नाही. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये मी इतकी क्रूरता पाहिली नव्हती."
दयेला जागा नाही
२०१७ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने राजेशला जन्मठेप आणि १५ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. याला राजेशने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. १७ डिसेंबर २०२५ रोजी न्यायमूर्ती रवींद्र मैठाणी आणि न्यायमूर्ती आलोक मेहरा यांच्या खंडपीठाने त्याचे अपील फेटाळून लावले. न्यायालयाने स्पष्ट केले की, राजेशसारख्या क्रूर गुन्हेगारासाठी तुरुंगच योग्य जागा आहे.