आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 08:52 IST2025-07-07T08:51:57+5:302025-07-07T08:52:33+5:30
एकीकडे देशभरात सोनम रघुवंशी प्रकरण चर्चेत असतानाच, आता महाराष्ट्रात राजा रघुवंशी हत्याकांडासारखी घटना घडली आहे.

आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
एकीकडे देशभरात सोनम रघुवंशी प्रकरण चर्चेत असतानाच, आता राजा रघुवंशी हत्याकांडासारखी घटना घडली आहे. ही घटना महाराष्ट्राच्या नागपूरमधून समोर आली आहे. नागपूरमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आजारी पतीची हत्या केली. सुरुवातीला महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय दिशा रामटेकने तिचा प्रियकर आसिफ उर्फ राजाबाबू टायरवाला याच्या मदतीने तिच्या अंथरुणाला खिळलेल्या पती चंद्रसेन रामटेकची हत्या केली. ही घटना तारोडी खुर्द परिसरात घडली आहे. चंद्रसेन यांना लकवा मारल्यामुळे ते अंथरुणावरच पडून होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. याच काळात दिशा आणि आसिफ यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले.
भांडणातून रचला हत्येचा कट
दिशाचे पती चंद्रसेन यांना जेव्हा दिशा आणि आसिफच्या संबंधांबद्दल समजले, तेव्हा त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाले. या भांडणातूनच चंद्रसेनला संपवण्याचा कट रचण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी दिशाने चंद्रसेनला अंथरुणावर झोपवले आणि आसिफने उशीने त्यांचे तोंड दाबून त्यांचा गळा आवळला. सुरुवातीला महिलेने पतीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचा दावा केला, पण शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याचे समोर आले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दिशाने आपला गुन्हा कबूल केला.
राजा रघुवंशी हत्याकांड
मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही अशीच एक घटना घडली होती, राजा रघुवंशी यांची त्यांची पत्नी सोनमने हनीमूनवर असताना त्यांची हत्या केली. सोनमचे राज कुशवाहसोबत, प्रेमसंबंध होते आणि याच कारणामुळे तिने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. राजाचा मृतदेह २ जून रोजी मेघालयमधील एका दरीत सापडला होता, तर पत्नी सोनम बेपत्ता होती. तिला नंतर उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आले.