आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 08:18 IST2025-12-22T08:16:23+5:302025-12-22T08:18:23+5:30
मेरठमध्ये घडलेल्या भीषण 'मुस्कान-सौरभ' हत्याकांडाची आठवण ताजी असतानाच, तशीच एक अंगावर शहारे आणणारी आणखी एक घटना समोर आली आहे.

आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या भीषण 'मुस्कान-सौरभ' हत्याकांडाने अवघा देश हादरून गेला होता. हे प्रकरण शमतच होते की आता संभल जिल्ह्यातही तशीच एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
नेमकी घटना काय?
संभल येथील ईदगाह परिसरातील पतरोआ रोडवर सोमवारी एका पॉलिथिन पिशवीत मानवी शरीराचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली होती. या पिशवीत मृतदेहाचा कापलेला हात आणि शरीराचे काही भाग होते, मात्र शीर गायब होते. पोलिसांनी तातडीने तपास चक्रावून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले.
हातावरील 'टॅटू'ने उघडले गुपित
पोलिसांना सापडलेल्या हातावर एक टॅटू गोंदलेला होता. हाच टॅटू या गुन्ह्याची उकल करण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मोहल्ला चुन्नी येथील रूबी नावाच्या महिलेने १८ नोव्हेंबर रोजी तिचा पती राहुल बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
पोलिसी खाक्या दाखवताच पत्नी बोलली
संशयावरून पोलिसांनी रूबीला चौकशीसाठी बोलावले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी कडक भाषेत विचारपूस करताच तिने तोंड उघडले आणि हत्येची कबुली दिली. रूबीने तिचा प्रियकर गौरव याच्या मदतीने राहुलचा काटा काढल्याचे मान्य केले.
मेरठच्या हत्याकांडाचा घेतला आधार
आरोपींनी चौकशीत मोठा धक्कादायक खुलासा केला. मेरठमध्ये ज्याप्रमाणे मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून सौरभची हत्या करून त्याचे तुकडे केले होते, अगदी त्याच पद्धतीने राहुलची हत्या करण्याचा प्लॅन या दोघांनी आखला होता. राहुलची हत्या राहत्या घरातच करण्यात आली आणि त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पिशव्यांमध्ये भरून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
अजूनही काही भाग बेपत्ता
फॉरेन्सिक टीमने राहुलच्या घरातून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी रूबी आणि गौरव या दोघांना अटक केली आहे. मात्र, राहुलचे शीर आणि शरीराचे इतर काही महत्त्वाचे भाग अद्याप सापडलेले नाहीत. पोलीस आरोपींच्या सांगण्यावरून विविध ठिकाणी छापेमारी करत असून हत्येसाठी वापरलेली शस्त्रे जप्त करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण संभल परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.