राजधानी दिल्लीत आणखी एक हत्याकांड; 22 वर्षीय तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:22 IST2023-05-30T14:21:27+5:302023-05-30T14:22:50+5:30
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

राजधानी दिल्लीत आणखी एक हत्याकांड; 22 वर्षीय तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतून तरुणीच्या हत्येची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील मजनू का टिला परिसरातील एका घरात 22 वर्षीय तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला आहे. मनीषा छेत्री असे मृत तरुणीचे नाव आहे. मृत तरुणी दिल्लीतील सफदरजंग भागातील रहिवासी आहे.
दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सपना नावाच्या महिलेने सकाळी सात वाजता पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. काल रात्री सपनाच्या घरी एक पार्टी होती, ज्यामध्ये एक मुलगा आणि आणखी दोन मुली आल्या होत्या. त्यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले आणि त्यानंतर मुलीवर चाकूने वार करण्यात आले. आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल. आरोपी आणि मयत तरुणी, हे तिघेही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करायचे.
साक्षी हत्याकांडाने दिल्ली हादरली
राजधानी दिल्लीत थरकाप उडवणारी घटना काल घडली. साहिल नावाच्या मुलाने एका 16 वर्षीय मुलीची 40 वेळा चाकू भोसकून आणि दगडाने ठेचून हत्या केली. या हत्येचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे. साहिल आणि मृत साक्षी यांच्यात प्रेमसंबंध होते. पण, काही कारणामुळे त्यांच्यात भांडण झाले आणि त्याच रागातून आरोपीने तरुणीची हत्या केली.