सेक्स रॅकेटचे आणखी एक बॉलीवूड कनेक्शन उघड, कास्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:53 IST2020-01-22T06:52:47+5:302020-01-22T06:53:07+5:30
चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका देण्याच्या नावाखाली तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला समाजसेवा शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

सेक्स रॅकेटचे आणखी एक बॉलीवूड कनेक्शन उघड, कास्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला अटक
मुंबई : चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका देण्याच्या नावाखाली तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरसह निर्मिती व्यवस्थापकाला समाजसेवा शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तीन मुलींची सुटका करण्यात आली असून, यापैकी दोघी मध्य आशियातील तुर्केमेनिस्तानमधील रहिवासी आहेत.
मूळच्या तुर्केमेनिस्तानमधील रहिवासी असलेल्या तरुणी विद्यार्थी व्हिसावर शिक्षणासाठी भारतात आल्या. सध्या त्या पुणे महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहेत. यापूर्वी दोघीही शूटिंगसाठी मुंबईत आल्या असताना, त्यांची ओळख निर्मिती व्यवस्थापक नावेद शरिफ अहमद अख्तर (२६) आणि कास्टिंग डायरेक्टर नावीद सादिक सय्यद (२२) यांच्यासोबत झाली. याच ओळखीतून दोघींनी त्याच्याकडे बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. या कामासाठी दोघींना तडजोड करावी लागेल, असे सांगण्यात आले.
सध्या एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी परदेशी मुली हव्या असून, शरीरसंबंध ठेवावे लागतील, असे सांगून वेश्याव्यवसायात ढकलल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
भारतीय मुलीकडे केलेल्या चौकशीत तिला दलाल महिलेमार्फत सादिककडे पाठविल्याचे समोर आले. दलाल महिला वर्सोवा येथील एका फ्लॅटमधून सेक्स रॅकेट चालवत असून, तिच्यासह आणखी दोन मुलींना वेश्याव्यवसायासाठी पाठवित असल्याचीही माहिती समाजसेवा शाखेच्या हाती लागली आहे. त्यानुसार, दोघांना अटक करत दलाल महिलेचा शोध पोलीसांकडून सुरू आहे.
यापूर्वी केली होती कारवाई
३ जानेवारी - जुहू परिसरातील झेड लक्झरी रेसिडेन्सी या तारांकित हॉटेलमध्ये छापा टाकून उझबेकीस्तान देशाच्या २ मुलींची सुटका करण्यात आली. बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर राजेशकुमार कामेश्वर लाल याला अटक केली.
१४ जानेवारी - वर्सोवा येथील कॅफे कॉफी डे मध्ये सापळा रचून दोन मॉडेल्सची सुटका करण्यात आली. या तरुणींनी हिंदी चित्रपटामध्ये ज्युनिअर आर्टिस्ट, तसेच बॉलीवूडमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. यातही कास्टिंग डायरेक्टर नवीनकुमार प्रेमलाल आर्याला अटक करण्यात आली.
१६ जानेवारी - ड्रॅगनफ्लाय हॉटेलमधून एका अल्पवयीन मुलीसह तिघींची सुटका करण्यात आली. अल्पवयीन मुलीने विविध वेब सीरिजमध्ये काम केले आहे, तर अन्य दोघींनी मराठी मालिकांसह सावधान इंडियामध्ये काम केले आहे. दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे.
सेक्स रॅकेटसाठी तारांकित हॉटेलचा आधार
गुन्हे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांच्या आदेशानुसार, समाजसेवा शाखेने सेक्स रॅकेटविरुद्ध कारवाईची मोहीमच सुरू केली आहे. त्याच्या चौकशीत अनेक दिग्गज मंडळी जास्तीचा पैसा कमाविण्यासाठी यात उतरत असून, पंचतारांकित हॉटेल्ससहीत विविध तारांकित हॉटेल्सचा आधार घेत असल्याचे लक्षात येताच, समाजसेवा शाखेने त्याकडे मोर्चा वळविला आहे. समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली या धडाकेबाज कारवाया सुरू आहेत.