अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; पत्नीलाही ईडीने बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:04 IST2021-07-14T18:03:21+5:302021-07-14T18:04:52+5:30
ED also issued summons Anil Deshmukh's Wife :ईडीने देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही अद्याप ईडीच्या चौकशीला हजर राहिलेलं नाही.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; पत्नीलाही ईडीने बजावले समन्स
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) समन्स बजावले आहे. उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी ही माहिती दिली आहे.
सीबीआयने (CBI) आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निर्णय राखून ठेवला आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. ईडीने देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेलं आहे. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही अद्याप ईडीच्या चौकशीला हजर राहिलेलं नाही.
याबाबत देशमुख यांचे वकील घुमरे यांनी ईडीला आम्ही वारंवार पत्राद्वारे विनंती केली आहे की तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते सांगा आम्ही देऊ. त्याचप्रमाणे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सगळं ऑनलाईन सुरु आहे तर चौकशीही ऑनलाईन माध्यमातून घ्या अशी आम्ही मागणी केली आहे, असे म्हणाले.