Andhra Pradesh Crime: आंध्र प्रदेशात एका शाळेतील शिक्षिकेचा क्रूरपणा समोर आला आहे. शिक्षिकेने एका विद्यार्थिनीला इतकी बेदम मारहाण केली की तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलीची आई देखील त्याच शाळेत काम करते. शिक्षिकेच्या कृत्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या डोक्यावर इतक्या जोराने प्रहार करण्यात आले की तिची कवटी फ्रॅक्चर झाली. वर्गशिक्षिकेनेच मुलीसोबत ही क्रूरता केली होती. विद्यार्थिनी मस्ती करत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षिकेने तिला जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान एका स्टीलच्या टिफिनने तिच्या डोक्यावर इतक्या जोरात हल्ला केले की तिची कवटी फ्रॅक्चर झाली. मुलीच्या डोक्याचा सीटी स्कॅन देखील समोर आला असून त्यामध्ये कवटीवर खोच पडल्याचे दिसून येत आहे.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. सात्विका नागश्री नावाच्या विद्यार्थिनीची हिंदी शिक्षिका सलीमा बाशा यांनी तिच्या शाळेच्या बॅगेने डोक्यावर प्रहार केले. बॅगेत एक स्टीलचा जेवणाचा डबा होता. विद्यार्थिनी वर्गात मस्ती करत होती. त्यामुळे शिक्षिकेने रागाच्या भरात तिला मारहाण केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थिनीची आईदेखील त्याच शाळेत विज्ञान शिक्षिका आहे. सुरुवातीला तिलाही हा सगळा प्रकार सामान्य वाटला. मात्र जेव्हा मुलीने तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येत असल्याची तक्रार केली तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर आईने तिच्या मुलीला बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे सीटी स्कॅनमध्ये कवटीला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले.
दरम्यान, यानंतर कुटुंबाने आरोपी शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुंगनूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.