समोश्यावरून वाद सुरू झाला अन् तलवारीच बाहेर निघाल्या! शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसर हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:24 IST2025-10-22T13:22:55+5:302025-10-22T13:24:31+5:30
मृतक शेतकऱ्याचे नाव चंद्रमा यादव होते. किरकोळ भांडणानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण..

AI Generated Image
एका क्षुल्लक वादातून माणसाचा जीव घेतला जाऊ शकतो, याचा प्रत्यय बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात आला आहे. समोशाच्या पैशांवरून सुरू झालेल्या एका वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी हा वाद मिटला होता, पण दुसऱ्या दिवशी आरोपींनी पुन्हा भांडण उकरून काढत या शेतकऱ्याला संपवले. ही धक्कादायक घटना चौरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलोडिहरी गावात घडली आहे.
किरकोळ वादातून मोठा गुन्हा
मृतक शेतकऱ्याचे नाव चंद्रमा यादव होते. किरकोळ भांडणानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीर आणि डोक्यावर तलवारीच्या हल्ल्याच्या गंभीर जखमा होत्या. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमका वाद काय होता?
मृतक चंद्रमा यादव यांचे मेहुणे देवमुनी सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी चंद्रमा यादव यांचा नातू गावातील आशा देवी नावाच्या महिलेच्या दुकानात समोसा खरेदी करायला गेला होता. तेथे एका समोशाच्या पैशांवरून नातू आणि दुकानमालक महिला यांच्यात किरकोळ वाद झाला. शनिवारी सायंकाळी हा वाद कसातरी मिटला होता. मात्र, रविवारी सकाळी चंद्रमा यादव हे पुन्हा आशा देवीच्या दुकानाजवळ गेले असता, हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आणि दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली.
तलवारीचा वार आणि उपचारादरम्यान मृत्यू
मारामारी सुरू असतानाच आरोपींनी आपल्या हातात असलेल्या तलवारीने चंद्रमा यादव यांच्या डोक्यावर वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना आरा सदर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पाटणा येथे रेफर केले. उपचारादरम्यान, सोमवारी रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह गावात आणला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतक शेतकऱ्याच्या मेहुण्याने आशा देवी आणि तिच्या मुलांना या हत्येसाठी जबाबदार धरले आहे. चौरी पोलीस ठाण्याचे प्रमुख जयराम शुक्ला यांनी सांगितले की, १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी झालेल्या मारहाणीत जखमी झाल्यामुळेच यादव यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.