अवघ्या ३५० रुपयांसाठी १८ वर्षीय युवकाचा घेतला जीव; अल्पवयीन आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 15:48 IST2023-11-22T15:48:16+5:302023-11-22T15:48:53+5:30
सध्या पोलीस फॉरेन्सिक पथकासह पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पाहणी करत आहेत.

अवघ्या ३५० रुपयांसाठी १८ वर्षीय युवकाचा घेतला जीव; अल्पवयीन आरोपीला अटक
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत खळबळजनक घटना घडली आहे. इथं वेलकम परिसरात एका १८ वर्षीय युवकाची निर्दयी हत्या केली आहे. १६ वर्षाच्या आरोपीनं या युवकाला लुटण्यापूर्वी त्याचे तोंड आणि गळा दाबून बेशुद्ध केले. त्यानंतर चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली. या युवकाच्या खिशात ३५० रुपये होते ते लुटून आरोपी युवक पसार झाला.पोलीस तपासात आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.
माहितीनुसार, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी उत्तर पूर्व दिल्लीच्या वेलकम परिसरात चोरीच्या उद्देशाने लपला होता. त्यावेळी एका युवकाचा गळा दाबून आणि चाकूने वार करून त्याने हत्या केली. २१ नोव्हेंबरच्या रात्री ११.१५ वाजता ईदगाह रोडवरील जनता मजदूर कॉलनीत हा प्रकार घडला.
डीसीपी जॉय टिर्की यांनी म्हटलं की, बुधवारी १६ वर्षीय आरोपीने सर्वात आधी मृत युवकाचा गळा दाबला त्यानंतर जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा आरोपीने चाकू भोसकून त्याची हत्या केली. यानंतर मृत युवकाच्या खिशात असलेले ३५० रुपये घेऊन तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात आणले परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने घोषित केले. अद्याप मृत युवक कोण याची ओळख पोलिसांना पटलेली नाही.
सध्या पोलीस फॉरेन्सिक पथकासह पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पाहणी करत आहेत. आरोपी युवक हा अल्पवयीन आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
दरम्यान, अमेठी जिल्ह्यातील संग्रामपूर भागच्या कालिकन भवानी धाम इथं बुधवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला. कालिकन देवी धामच्या तलावात पाण्यावर तंरगणारा मृतदेह अभिषेक मिश्रा या युवकाचा असल्याचं समोर आले. तो अमेठीतील खेरौना गावचा रहिवासी होता. त्याची हत्या कशी आणि का झाली याचा पोलीस शोध घेत आहेत.