५३ वर्षाच्या काकीचा २७ वर्षाच्या पुतण्यासोबत विवाह; हत्येनंतर पोलिसांनी पतीला केली अटक, आई फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:58 IST2025-06-12T11:49:19+5:302025-06-12T11:58:48+5:30
माझगाव येथील ५३ वर्षीय महिलेच्या खूनाच्या प्रकरणात २७ वर्षीय पतीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

५३ वर्षाच्या काकीचा २७ वर्षाच्या पुतण्यासोबत विवाह; हत्येनंतर पोलिसांनी पतीला केली अटक, आई फरार
Mumbai Crime: माझगाव येथील ५३ वर्षीय महिलेच्या खूनाच्या प्रकरणात २७ वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी ५३ वर्षीय गुलशन खान यांचा इमारतीमधून पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे समजून गुन्हा नोंदवला होता. मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून गुलशन खान यांची हत्या झाल्याचे उघड झालं. त्यानंतर खान यांच्या मृत्यूप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी खान यांचा पती शोएब इम्तियाज याला अटक केली. या प्रकरणात शोएबचा भाऊ जैद इम्तियाज हुसेन खान आणि आई रोशन खान या सहआरोपी असून ते फरार आहेत. पोलिसांना सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचा संशय होता, मात्र तपासात हत्येचा कट रचल्याचे समोर आलं.
मुख्य आरोपी, शोएब इम्तियाज खान उर्फ बोबदा हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शोएबने गुलशन खान यांच्याशी विवाह केला होता. शोएब हा त्यांचा पुतण्या होता. २०२२ मध्ये गुलशन आणि शोएब यांनी विवाह केला होता. त्यावेळी गुलशन या पहिल्या पतीच्या घरातून ६५ तोळे सोने घेऊन आल्या होत्या. ६ एप्रिल रोजी गुलशन यांचा भायखळा येथील मोंटे साउथ इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर गुलशन यांचे पहिले पती हशमत खान यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ एप्रिल रोजी शोहेब, त्याचा मोठा भाऊ आणि त्याची आई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ६३ वर्षीय लाकूड व्यापारी हशमत खान यांनी चार विवाह केले आहेत आणि गुलशन ही त्यांची दुसरी पत्नी होती.
हशमत खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुलशन या गेल्या सात वर्षांपासून पुतण्या शोहेबसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. जेव्हा हशमत यांना याबाबत कळले तेव्हा त्यांचा गुलशन यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर गुलशन डिसेंबर २०२२ पासून त्यांच्या मुलीसह शोहेबसोबत राहू लागल्या. "२ एप्रिल रोजी गुलशनने मला शोहेबसोबत राहण्याच्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप झाला आहे आणि शोहेब, त्याचा भाऊ आणि त्याची आई पैशासाठी माझा छळ करत आहेत, मला आता जगायचे नाही असं सांगितले होते," असं हशमत खान म्हणाले.
दरम्यान, हशमत यांच्या म्हणण्यानुसार, ते गुलशन यांच्यावर रागावला होते, म्हणून त्यांनी त्ंयाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी गुलशन यांच्या आत्महत्येची बातमी मिळाली. घटनास्थळी पोलिसांना अनेक पुरावे सापडले होते ज्यामुळे शोहेबवर संशय निर्माण झाला होता. पोलिसांना रातील बाथरूमच्या दारावर आणि चप्पलवर रक्ताचे डाग आढळले होते. त्यामुळे पोलिसांनी ते हे पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले. अहवालामधून गुलशन यांची हत्या झाल्याचे समोर आलं.