भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:01 IST2025-04-21T19:00:57+5:302025-04-21T19:01:10+5:30
आग्रा डीसीपी सिटी सोनम कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.

भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
आग्रा पोलिसांनी एक धक्कादायक प्रकार उघड केला. एका आई, भाऊ आणि वहिनीने कुटुंबातील संपत्तीच्या वाटणीसाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. मुलाला आणि सुनेला लाडूंमध्ये विष देऊन ठार मारलं आहे. याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. शाहगंज पोलीस स्टेशन परिसरात ही भयंकर घटना घडली आहे.
१७ एप्रिल रोजी पती-पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आलं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पती-पत्नी बेडवर बेशुद्ध पडले होते आणि त्यांची एक महिन्याची मुलगी जवळच रडत होती. पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेतील पती-पत्नीला रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. ज्या ठिकाणी पती-पत्नीचे मृतदेह सापडले तिथे लाडूही पडलेला होता. त्यामुळे पती-पत्नीने आत्महत्या केल्याचं दिसून आलं.
पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले, फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आणि सखोल तपास सुरू झाला. याच दरम्यान पोलिसांनी नातेवाईक आणि जवळच्या लोकांचीही चौकशी केली, त्यानंतर कौटुंबिक वाद असल्याचं समोर आलं. पोलीस तपासात असं दिसून आलं की, आईने तिचा एक मुलगा आणि सुनेसह लाडूमध्ये विष मिसळले होतं आणि ते दुसऱ्या मुलाला आणि सुनेला खायला दिलं होतं, ज्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला.
आग्रा डीसीपी सिटी सोनम कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. डीसीपी सिटी सोनम कुमार यांना सुरुवातीला पती-पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळाली होती. मात्र तपासानंतर असं उघड झालं की, दोघांचीही हत्या लाडूमध्ये विष मिसळून करण्यात आली. या प्रकरणात आई, भाऊ, भावाची पत्नी आणि छोट्या भावाला अटक करण्यात आली आहे.