धक्कादायक! TCS च्या मॅनेजर नंतर आता आग्र्याच्या जितेंद्रचा व्हिडीओ व्हायरल, प्रेयसीवर नाराज होऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:25 IST2025-03-01T15:24:55+5:302025-03-01T15:25:35+5:30
आग्रामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने प्रेयसीवर नाराज होऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक! TCS च्या मॅनेजर नंतर आता आग्र्याच्या जितेंद्रचा व्हिडीओ व्हायरल, प्रेयसीवर नाराज होऊन केली आत्महत्या
दोन दिवसापूर्वी मुंबईतील एका टीसीएस मॅनेजरने बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान, आता आणखी अशीच एक धक्कादायक घटना आग्रामधून आली आहे. १६ फेब्रुवारी रोजी किरवली येथील अछनेरा पोलीस ठाणे परिसरात एका तरुणाने आत्महत्या केली. शुक्रवारी, तरुणाची सुसाईड नोट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या तरुणाने त्याच्या आत्महत्येसाठी त्याच्या प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरले आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Swargate Rape Case: आरोपीच्या गळ्यावर दिसणाऱ्या खुणा कुठून आल्या?; चौकशीत समोर आलं आणखी एक सत्य
राजेंद्र सिंह यांचा मुलगा जितेंद्र कुमार उर्फ बंटी बघेल हा दोन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ आहे. तो एका खासगी कंपनीत काम करायचा. १६ फेब्रुवारी रोजी संशयास्पद परिस्थितीत त्याने घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर कुटुंबीयांना माहिती झाले. जितेंद्र यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ आणि एक सुसाईड नोट पोस्ट केली होती.
प्रेयसीच्या कुटुंबीयांवर केले आरोप
व्हिडीओ आणि सुसाईड नोटमध्ये, त्याने त्याच्या प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांच्या धमक्या आणि पैसे हडप करूनही लग्न न केल्याबद्दल उल्लेख केला होता. आता कुटुंबातील सदस्यांनी अछनेरा पोलीस ठाण्यात सुसाईड नोटमधील आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी नीरू, तिचे भाऊ मनोज, सौरभ, वडील कमल सिंह फौजी आणि आई मीना देवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटनेतील सर्व तथ्यांची चौकशी केली जात आहे. मृताच्या मोबाईल फोनचा सीडीआर आणि त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरील पोस्टची तांत्रिक तपासणी केली जात आहे. प्रेयसी, तिचा भाऊ आणि पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये आरोप काय?
मृत जितेंद्र याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ २.२९ मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, त्याला ज्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते तिच्याशी लग्न करायचे होते. लग्नाच्या बहाण्याने मुलीने हळूहळू सुमारे सात लाख रुपये हडप केले. असे असूनही, लग्नाला नकार मिळत राहिला. जेव्हा त्याने त्याचे पैसे परत मागितले तेव्हा मुलीने तिच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याला धमकावण्यास सुरुवात केली. मला दररोज धमक्या येऊ लागल्या. यानंतर, आत्महत्येचे पाऊल उचलण्यास भाग पाडले, असं या व्हिडीओमध्ये जितेंद्र याने सांगितले आहे.