सहा दिवसांनी सापडला खाडीत पडलेल्या चिमुरड्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 20:28 IST2022-07-18T20:27:35+5:302022-07-18T20:28:15+5:30
Deadbody Found : मृतदेह सोमवारी खाडीतून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला.

सहा दिवसांनी सापडला खाडीत पडलेल्या चिमुरड्याचा मृतदेह
ठाणे : घरावर सायकल चालवताना तोल जाऊन कळवा खाडीत पडून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय ऋषी उस्वा या चिमुरड्याचा मृतदेह तब्बल सहा दिवसांनी विटावा ते ऐरोली खाडीच्या दरम्यान मिळून आला. स्थानिक मच्छिमारांनी शोध घेत, त्याचा मृतदेह सोमवारी खाडीतून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला.
बुधावरी १३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरावर सायकल चालवताना, तो चिमुरड्याचा तोल जाऊन कळवा खाडीत पडला होता. विटावा खाडी, ऐरोली खाडीमध्ये मागील ६-दिवसापासून स्थानिक मच्छिमार व जीवरक्षक राजेश खारकर यांच्या टीमसोबत ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांच्या मार्फत ३-बोटींच्या मदतीने शोधकार्य सुरू होते. अखेर सोमवारी सायंकाळी १७:४० वाजताच्या सुमारास विटावा ते ऐरोली खाडीच्या दरम्यान त्या चिमुरड्याचा मृतदेह सापडला अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.