Bengaluru Instagram Stalking Case: सोशल मीडियावरील ओळख किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय बंगळुरूमध्ये आला आहे. इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतापलेल्या या तरुणाने तरुणीचा पाठलाग करून तिला मारहाण केली आणि तिचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे.
इन्स्टाग्रामवरून मैत्री आणि छळाची सुरुवात
पीडित तरुणी मूळची चिक्कमगलुरू येथील असून ती बंगळुरूमध्ये एका खासगी कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करते. ३० सप्टेंबर रोजी तिने कामासंदर्भात एक जाहिरात इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देत नवीन नावाच्या तरुणाने तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला कामाच्या बहाण्याने बोलणे सुरू झाले, त्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. काही दिवस नवीनने अतिशय सभ्यपणे बोलून तरुणीचा विश्वास संपादन केला.
नोकरी आणि घर बदलले तरी पाठलाग सोडला नाही
मैत्रीचे रूपांतर प्रेमात करण्यासाठी नवीनने तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. या नकाराने नवीन चिडला आणि त्याने तरुणीचा छळ सुरू केला. तो तिच्या ऑफिस आणि पीजीच्या बाहेर तासनतास उभा राहून तिचा पाठलाग करू लागला. या त्रासाला कंटाळून तरुणीने तिची नोकरी सोडली आणि राहण्याचे ठिकाणही बदलले. मात्र, नवीनने विविध माध्यमांतून तिचा माग काढणे सुरूच ठेवले.
भररस्त्यात गाठले आणि केला हल्ला
२२ डिसेंबर रोजी दुपारी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत स्कूटीवरून बाहेर जात असताना, नवीनने कारने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना मध्येच अडवले. कारमधून उतरून त्याने तरुणीच्या डोक्यावर, पाठीवर आणि मानेवर जोरदार प्रहार केले. प्रत्यक्षदर्शी आणि पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्याने गर्दीच्या ठिकाणी तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जाळ्यात
हल्ल्यानंतर तरुणीने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, नवीनचा हा निर्लज्जपणा कॅमेऱ्यात कैद झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून २४ तासांच्या आत नवीनला बेड्या ठोकल्या. चौकशीदरम्यान नवीनने दावा केला की, "ती माझ्याशी रिलेशनशिपमध्ये होती आणि गिफ्ट्स घेतल्यानंतर तिने मला ब्लॉक केले, म्हणून मी रागाच्या भरात हे पाऊल उचलले."
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी नवीनवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७६, ७८, ७९ आणि ३५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Bengaluru man arrested for attacking a woman who rejected his proposal. He stalked her, assaulted her, and attempted to disrobe her in public. The accused claimed she took gifts before blocking him.
Web Summary : बेंगलुरु में एक शख्स ने प्रस्ताव ठुकराने पर महिला पर हमला किया। उसने महिला का पीछा किया, मारपीट की और सार्वजनिक रूप से कपड़े फाड़ने की कोशिश की। आरोपी ने दावा किया कि उसने तोहफे लेने के बाद उसे ब्लॉक कर दिया।