ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:50 IST2020-09-24T06:49:59+5:302020-09-24T06:50:25+5:30
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे समन्स : धक्कादायक बाबी येणार समोर

ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका, सारा, श्रद्धा, रकुल यांचीही आता झाडाझडती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी आघाडीच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांना चौकशीला पाचारण करण्यात येणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी चौकशीसाठी बोलावले जाईल. तर रकुल प्रीत सिंग, सिमोन खंबाटा यांची चौकशी गुरुवारी केली जाणार आहे.
टॅलेंट मॅनेजर जया साहा हिच्याशी केलेल्या व्हॉटसअप चॅटमध्ये त्यांची नावे समोर आल्याने चौकशी केली जाणार असल्याचे एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या कलाकारांची कसून चौकशी केल्यास बॉलीवुडशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सुशांत आत्महत्या ते ड्रग्ज रॅकेट अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून बॉलीवूडमधील हे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले. या तपासादरम्यान घेतलेल्या जबाबातून या कलाकारांची नावे समोर आली आहेत.
टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नावे समोर आल्याने चौकशी
२०१७ मध्ये पार्टीसाठी दीपिकाने मॅनेजरकडे केली होती ‘माल’साठी विचारणा
सारा अली खानने सुशांतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या शूटिंगदरम्यान ती गांजा घेत होती, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिल्याचे समजते.
श्रद्धा कपूर सीबीडी आॅईल घेत असल्याचा जबाब जया साहाने दिला आहे.
रकुल प्रीत सिंग, सिमोन खंबाटा यांच्या सहभागाबाबत पुरावे मिळाले आहेत, असा दावा एनसीबीने केला आहे.
या सर्वांकडे सविस्तर चौकशी केली जाणार आहे. त्यांना समन्स बजाविण्यात आले असून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे एनसीबीचे उप संचालक केपीएस मल्होत्रा यांनी बुधवारी स्पष्ट केले.