सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:41 IST2025-10-18T13:40:26+5:302025-10-18T13:41:07+5:30
सीट बेल्ट न लावल्याने त्याला झालेल्या दंडाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा लागला.

सीट बेल्ट दंडामुळे सापडला सव्वा कोटीच्या फसवणुकीतील आरोपी; मंगळुरूमध्ये अटक
मुंबई : बनाना लीफ रेस्टॉरंटमधून १.२३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी मॅनेजर दिनाथ शेट्टी (३१) याला अटक केली. गेल्या वर्षभरापासून पसार असलेल्या आरोपीचा शोध मुंबई पोलिसांनी मंगळुरू पोलिसांच्या मदतीने घेतला. सीट बेल्ट न लावल्याने त्याला झालेल्या दंडाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा लागला.
मालगुडी फूड्सचे संचालक सूरज शेट्टी यांनी दिनाथ याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बनाना लीफ रेस्टॉरंट्स चालवणाऱ्या या कंपनीच्या पाच शाखांसाठी दिनाथ याची ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली होती. त्याच्यावर ९ जानेवारी ते १ मे २०२४ या कालावधीत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम गैरमार्गाने वापरल्याचा आरोप आहे. त्याकाळात तो सांताक्रूझ पश्चिम येथील जुहू तारा रोडवरील बनाना लीफ शाखेत कार्यरत होता.
गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर दिनाथने आपला मोबाइल बंद केला, बँक व्यवहार थांबवले आणि सोशल मीडियावरून संपूर्णपणे गायब झाला. पोलिसांनी मिळवलेल्या सिबिल ट्रान्स युनियन रिपोर्टनुसार, आरोपीने विविध बँकांकडून कर्ज घेतल्याचे समोर आले होते. यात कारसाठी घेतलेल्या कर्जाचाही समावेश होता. पोलिसांनी त्याच्या कारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे तपास सुरू केला असता, मंगळुरूमध्ये त्या वाहनावर सीट बेल्ट न घातल्यामुळे दंड आकारण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
दोन दिवस कसून शोध
सांताक्रूझ पोलिसांनी मंगळुरू पोलिसांच्या मदतीने दोन दिवस परिसरात गस्त घालून दिनाथचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी ट्रान्झिट रिमांडवर त्याला मुंबईत आणण्यात आले. ही संपूर्ण कारवाई तपास अधिकारी निरीक्षक शरद जाधव, गुन्हे विभागाचे निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.