पोलीस ठाण्यातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; चंद्रपूरच्या सावलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 19:01 IST2021-05-23T18:59:51+5:302021-05-23T19:01:07+5:30
Crime News: सावली येथील घटना : अवैध दारूविक्री प्रकरणातील आरोपी

पोलीस ठाण्यातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; चंद्रपूरच्या सावलीतील घटना
सावली (चंद्रपूर) : सावली पोलीस ठाण्यात अवैध मोहफुल दारू विक्री प्रकरणातील आरोपीने स्वच्छतागृहात फिनाईलसदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सावली येथे शनिवारी पोलिसांनी गस्तीदरम्यान किसान नगर भागात अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. यादरम्यान आरोपींनी पोलिसांनाच मारहाण केली. यावरून आकाश गरीबचंद मजोके, गरीबचंद मजोके, सुमित मजोके इतर एक असे चारही आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. मात्र संध्याकाळच्या दरम्यान गरीबचंद यांच्या पत्नीने दोन्ही मुले व पतीला पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करायला लावले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र रविवारी यातील आकाश मजोके नामक आरोपीने स्वच्छतागृहात फिनाईलसदृश्य द्रावण प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी त्याला तत्काळ सावली येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. आरोपीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास ठाणेदार रोशन शीरसाट व उपनिरीक्षक शशीकर चीचघरे करीत आहेत.