खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपीला १६ वर्षांनी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 13:30 IST2019-05-16T13:28:28+5:302019-05-16T13:30:02+5:30
एलसीबीच्या वसई युनिटची कारवाई : नालासोपाऱ्यातील बांधकाम व्यावसायिक हत्या प्रकरण

खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपीला १६ वर्षांनी अटक
नालासोपारा - पूर्वेकडील तुळींज रोड येथे २००३ साली बांधकाम व्यावसायिकाची जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल १६ वर्षांनी एलसीबीने सोमवारी मुंबई येथून अटक केले आहे. कमलेश उर्फ कमल प्रताप अमोल जैन असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. मीरा रोड येथील पेणकर पाडा येथील जमिनीच्या वादावरून गँगस्टर लोकांशी हातमिळवणी करून राजेश पंतगे याची हत्या करण्याचा कट रचला होता.
त्यावेळी १४ जणांविरूध्द नालासोपारा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून १० आरोपींना पोलिसांनीअटक केली होती. चार फरार आरोपीपैकी १ आरोपी हा मुंबई पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता. तीन फरार आरोपीपैकी कमलेश उर्फ कमल प्रताप अमोल जैन याला एलसीबीच्या वसई युनिटने मुंबईच्या बोरिवली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली.
२००३ साली घडली होती घटना
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोडवरील इमारतीमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक राजेश पतंगे (४३) यांची २५ आॅक्टोबर २००३ साली सकाळी राधाकृष्ण हॉटेलजवळ मित्रासोबत उभे होते. त्यावेळी मोटार सायकलवरून आलेल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती.